आमदार गजभियेचा शिवछत्रपती वेशातील मुजरा शिवभक्तांच्या भावना दुखवणारा

सोशल मिडिया अनेक संतप्त तथा समिश्र प्रतिक्रिया सोशल मिडिया वर दिसतात त्यापैकीच ही एक प्रतिक्रिया 

शिवाजी राजांचा पोशाख परिधान करून विधीमंडळ कामकाजात भाग घेण्यास गेलेल्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी त्याच वेशात अन्य नेत्यास मुजरा करतानाच्या छायाचित्राचा संदर्भ देत काही शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला आहे.
यावरचे माझे मत..
पोशाख केल्याने वा तशी वेशभूषा केल्याने कुणास शिवछत्रपती  महाराज होता येत नाही...
मुजरा त्या वेशातील राजकारणी व्यक्तीने केला आहे...

तसं बघायला गेलं तर शिवबांच्या घराण्याचा वारसा सांगणारे वारसदारही आज कोणत्या न कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने कललेले आढळतात, त्या राजकीय लाचारीबद्दल आपण बोलतो का ? ....

आपला शिवअभिमान डोक्यावर घेऊन नाचण्याचा नसावा तर तो डोक्यात ठेवून जगण्याचा असावा...

वीर शिवा काशीद यांनी तर शिवबांच्या समक्ष वेष धारण केला होता आणि सवयीने सरदारांना मुजरा केला होता...

इतिहासापासून प्रेरणा घेताना माथी भडकवण्याची मानसिकता न घेता त्यातून नेमका बोध घेत महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेण्याचे प्रयत्न व्हायला हवेत...

कुणी एका लुंग्या सुंग्याने राजांचा वेश घालून दुसऱ्या लुंग्या सुंग्यास त्याच वेशात कुर्निसात / मुजरा केल्याने राजांचा अवमान होण्याइतके आपले राजे सामान्य नव्हते, ते एकमेवाद्वितीय होते, त्यांचा अभिमान अशा पद्धतीने व्यक्त करून आपण एक प्रकारे त्यांचा अवमान करतो ....

'छत्रपती शिवाजी' या चित्रपटाच्या सेटवर शिवबांच्या भूमिकेत असलेल्या चंद्रकांत मांढरेंनी भालजींना पाहताच सवयीने हात जोडले तेंव्हा भालजींनी त्यांचे हात धरत त्यांना उलटा नमस्कार केला आणि म्हटलं की, 'आपण या ओजस्वी वेशात आहात आपण कुणास वंदन करावं असं इथं कुणीच नाही ! आम्हीच आपल्याला मुजरे करायला हवेत !' नंतर दोघांनी आलिंगन दिलं. राजांच्या पोषाखामागची नैतिक मुल्ये कळायला तितके नैतिक आणि वैचारिक अधिष्ठान असावे लागते. ते बाजारू राजकारण्यांकडे कुठून येणार ? तेंव्हा आपणही तिथे आपल्या अस्मितेचा बाऊ करण्यात काय हशील आहे ?
मुजरा करणाऱ्या आणि करवून घेणाऱ्या लोकांना याचे भान असायला हवे आणि त्याहून अधिक यांना निवडून देणाऱ्यांना असायला हवे. त्यावर आपण बोलतो का ?         

गजभिये यांनी राजांचा पोशाख घालण्याआधी आपण तो पोशाख परिधान केल्यानंतर कोणत्या जबाबदारीने वागावे लागते आणि आपली देहबोली काय असावी लागते, आपण कसे वागावे लागते याचाही विचार करायला हवा होता. पण इतके तारतम्य असले असते तर ते राजकारणी कसे झाले असते ? ... असो ..

कदाचित माझे विचार अनेकांना पटणार नाहीत पण थंड डोक्याने विचार केला तर त्यात तथ्य नक्की आढळेल..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या