युवापिढी अडकली इंटरनेटच्या माया जाळात, प्रेम, माया, ममता, माणुसकी हरवली !


                       व्यापक जनजागृती व योग्य वापराचे प्रशिक्षण देणे काळाची गरज !

माहूर- (जयकुमार अडकीने) तंत्रज्ञानाने मानव जीवनात अमुलाग्र सकारात्मक बदल घडविले असले तरी तंत्रज्ञांनाच्या योग्य वापरा अभावी हेच तंत्रज्ञान शाप की वरदान असे विचारमंथन करण्याची वेळ आता प्रत्येक नागरिकावर आलेली आहे. तंत्रज्ञात मानवी जीवनात अत्यंत महत्वाचा भाग बनलेल्या इंटरनेट च्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत असून तुझ्यात जीव रंगला या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलवरील स्लोगन आता युवा पिढीचा इंटरनेट मध्ये जीव रंगला असा बदल करून नवा स्लोगन प्रसिद्ध होत आहे.

          या इंटरनेट सेवेची व्याप्ती शहरी भागातून आता अगदी गाव खेड्यात सुद्धा विविध कंपन्यांचे टॉवर पोहचल्याने पार खेड्या पाड्यात पोहचली असून इंटरनेट रिचार्जसुद्धा आता मोबाईल कंपन्याच्या वाढत्या स्पर्धेने परवडणारी झाल्याने ग्रामीण भागातील युवकांना पण जुन्या काळातील दारू, मटका, जुगाराच्या व्यसनाप्रमाणे इंटरनेटचे व्यसन लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. यामध्ये मुले,मुली असा कोणताही भेद राहिलेला नसून ग्रामीण भागात वाटसप, फेसबुक च्या माध्यमातून मैत्री होऊन त्याचे प्रेमात रुपांतर होऊन सैराट होण्याच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. विशेष करून १६ ते २५ वयोगटातील तरुणांना या इंटरनेटचे मोठे व्यसन लागलेले दिसत असून या सुरुवातीला चांगली वाटणाऱ्या व भविष्यात गंभीर प्रतिकूल  परिणाम करणाऱ्या या जटील समस्येकडे वेळीच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

          मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून देशभरात शहरासह ग्रामीण भागाची बाजारपेठ काबीज करण्यात कंपन्या कसलीही कसर सोडत नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. मोबाईल, इंटरनेटचा वापर करण्यात लहान मुले, मुली, महिलांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. भविष्याच्या दृष्टीने हे अतिशय घातक असून मोबाईल इंटरनेटच्या अतिवापरामुळे पूर्वी जी आपुलकी माणसामाणसात होती ती प्रेम, माया, ममता माणुसकी हरवली असल्याचे दिसून येत असून माणुसकीचा सरेआम खून होत असल्याने संवेदनशील नागरिकांना कमालीच्या वेदना होतांना दिसत आहेत. या गंभीर बाबीकडे कुणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे वास्तव असून सगळे इंटरनेटच्या माया जाळात अडकलेले असतांना मुले इंटरनेटचा वापर कशासाठी करतात, याकडे पालकांनी व घरातील प्रौढ मंडळीनी आवर्जून पाहणे गरजेचे आहे. व्हाटसप, फेसबुक, युट्युब, मध्ये तरण पिढी इतकी तल्लीन आहे की, आपण जेवण करत आहोत, की, रस्ता पार करत आहोत याचे सुद्धा भान हरपल्या जात असल्याने रस्त्यावर होणाऱ्या अनेक अपघाताचे हे सुद्धा एक कारण असल्याचे बोलल्या जात आहे. संदेश देणे घेणे व काही ज्ञानाच्या गोष्टी सुविचारांची देवाणघेवाण करणे व युवापिढीला संस्कार मिळणे तसेच विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अॅप मुळे ज्ञानात भर पडणे या बाबीसाठी जरी हे योग्य असले तरी  याउलट शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा व्हाटसप, फेसबुकचे विविध ग्रुप तयार करणे त्यावरून खट्याळ खोडकर टिपण्या करणे, वाद विवाद करणे आक्षेपार्ह  पोस्ट, टिपण्णी करणे आदी कारणामुळे अनेक ठिकाणी मोठे वाद उपस्थित होतांना दिसतात. त्यातच नेमकेच तारुण्यात पदार्पण करत असलेले काही इरसाल नमुने गुगल व इतर इंटरनेट सर्व्हरवर उपलब्ध असलेले अश्लील व्हिडीओ व चित्रे, गाणे पाहणे असे प्रकार बिनदिक्कतपणे तासनतास करतांना दिसतात.  परिणामी या मध्ये त्यांचा अभ्यास व रोजगाराचा बराच अमुल्य वेळ खर्ची पडत असल्याने पर्यायाने राष्ट्राचे फार मोठे नुकसान होत आहे. शासकीय कर्मचारी सुद्धा यात कुठेही कमी पडलेले दिसत नसून कर्तव्याच्या वेळेत तासनतास मोबाईलवर चाटिंग करत दिन जाव तनखा आवचे धोरण अवलंबतांना दिसतात.त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसतो.  ही बाब राष्ट्राला घातक ठरत असून इंटरनेट सेवेच्या वापराबाबत आचारसंहिता तयार करणे गरजेचे असल्याने  यावर कुणीतरी नियंत्रण ठेऊन इंटरनेटचा कोणत्या बाबीसाठी किती टक्के वापर होतो हे पाहणे आवश्यक आहे.

    महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्यसनमुक्ती विषयी जनजागृती अभियान राबविल्या जाते त्याच धर्तीवर इंटरनेटच्या योग्य वापराचे संस्कार देणारे प्रशिक्षण शिबिरे गावोगाव घेणे आवश्यक असून प्रत्येक गावातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांनीच ही जबाबदारी घेऊन आपल्या परिसरातील नवोदित समाजसेवकांना या बाबी सुचवून त्यांना मार्गदर्शन करून अशी शिबिरे आयोजित करण्यास प्रवृत्त करण्याची राष्ट्रहितासाठी नितांत आवश्यकता आहे.

माहूर मोबा.९६२३४१०७३२, ९३२५१०५४७७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या