अवैध व्यवसायिकांच्या लॉबीमुळे वाढती संघटीत गुन्हेगारी चिंतेची बाब !- -जयकुमार अडकीने माहूर

जनसामान्याना सरळमार्गाने जीवन जगणे बनले कठीण !       

                                                                                                                                                                                                                           -जयकुमार अडकीने माहूर मोबा.९६२३४१०७३२ 

          राज्यात अत्र,तत्र, सर्वत्र, मटका, गुटखा, हातभट्टी दारू, गांजा तस्करी व कमी कालावधीत रोडपतीला करोडपती बनविणारा रेती तस्करीचा धंदा व इतर अवैध व्यवसाय करणारा एक मोठा समूह समाजात निर्माण झाल्याने संघटीत गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राच्या रांगड्या मातीत जन्मलेल्या व एक सुसंस्कृत सृजनशील व सर्वधर्मसमभाव जोपासणारा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शांतीच्या संदेशाला अभिप्रेत असे राज्य निर्माण करण्यसाठी आपली हयात झीजवणाऱ्या महापुरुषांना पडावा अशी स्थिती सध्या निर्माण झाली असून सरळमार्गी जीवन जगणाऱ्याना जीवन जगणे कठीण बनले आहे.

         राज्यातील कोणत्याही तालुक्याच्या मुख्यालयी चार, आठ दिवस मुक्काम करून गुप्तपणे अभ्यास केल्यास  हे विदारक चित्र निदर्शनास आल्या शिवाय राहणार नाही. कायदा व सुव्यस्था सांभाळणारी मंडळी सुद्धा (काही अपवाद वगळता) कशी अवैध व्यवसायिकांशी हातमिळवणी करतात हे स्पष्टपणे दिसून येईल.  शासनातर्फे व्यसनमुक्त गाव होण्याच्या दृष्टीने कितीही प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले तरी गावातील हातभट्टी दारू अद्याप तरी पूर्णतः बंद झाली असल्याचे दिसून येत नाही. राज्यामध्ये बंदी असलेला गुटखा गावागावात किराणा दुकान, पान टपऱ्यावर सहजपणे उपलब्ध होतो.

          ग्रामीण भागातील नागरिकांना बरबाद करून टाकणारा वरळी मटका राजरोसपणे सुरु असल्याचे दिसते अनेक ठिकाणी तर सेल्समन प्रमाणे खांद्याला पिशवी लटकवून वहीत मोबाईल मटका सुद्धा घेतल्या जात असल्याचे दिसते,  बऱ्याच ठिकाणी तर या अवैध व्यवसायाच्या भागीदारीत ज्यांच्यावर हे रोखण्याची जबाबदारी आहे तेच सहभागी असल्याचे सुद्धा असल्याचे भीषण वास्तव असून ज्याच्यावर हातभट्टी दारू पकडून कार्यवाही करण्याची जबाबदारी आहे असे काही पोलीस दादा स्वतःच त्या हातभट्टी चालकाचे रोजचे फुकटे  ग्राहक बनलेले पण पहावयास मिळतात. त्याच प्रमाणे कमी कालावधीत रोडपतीला थेट करोडपतीच बनविणारा रेती तस्करीचा व्यवसाय तर अनेक तालुक्यात साजूक धंदा बनला आहे. या मंडळीचे गाव कोतवाल, तलाठ्यापासून ते थेट जिल्हा कचेरी पर्यंत लागेबांधे असल्याने व याच मंडळीमध्ये राजकारणातील दादा,भाऊ,अण्णा, आप्पा, नाना लोकांचे कार्यकर्ते सर्वधर्मसमभाव जोपासत सामील झालेले असल्याने राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने तालुक्याचे डॉन बनल्याचे बघावयास मिळत आहेत. त्यांच्यावरील मोठ्या वरदहस्तामुळे सामान्य नागरिक त्यांच्या वाटयाला कधी जात नसल्याचे कटूसत्य आहे.

          शिवाय प्रशासनातील संबंधित मंडळीचे या लोकांशी आर्थिक हितसंबध जुळलेले असल्याने सामान्य नागरिकांच्या तक्रारीला कुठेही दाद मिळत नाही. एखाद्याने वरिष्ठ स्तरांपर्यंत पाठपुरावा करून हे अवैध व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न केलाच तर तो आर्थिकदृष्ट्या कमजोर पडतो व अवैध व्यवसायातून करोडोची माया जमविलेले लोक संबधितास आर्थिक प्रलोभन देऊन होत असल्यास मॅनेज करून त्यास एकाकी पाडतात. हीच मंडळी समाजात व गावात प्रतिष्ठीत नागरिक, थोर समाजसेवक अशी नावाची बिरुदावली लावून मिरवितात व अर्थाच्या जोरावर गावाची सत्ता पण मिळवतात. सत्तेपुढे शहानपणा चालत नाही या उक्तीप्रमाणे विरोध करनाऱ्याचा  नानाप्रकारे छळ करतात. काहीना आर्थिक आमिषे देतात, काहीचे जगणे मुश्कील करतात.

          सर्वांना समान असलेला कायदा सर्वसामान्य नागरिकाच्या उपयोगी पडल्याचे ऐकिवात नाही. प्रसार मध्यमामध्ये सुद्धा जीवाची तमा न बाळगता  आपला धर्म जोपासत देशसेवा करण्याची निष्ठा बाळगणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. मात्र त्यांना वाळीत टाकल्याप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करत जाणीवपूर्वक त्यांचे मानसिक खच्चीकरण सुद्धा करण्यास ही मंडळी मागेपुढे पाहत नाही. कायद्याच्या रक्षकाकडे दाद मागावी तर त्याठिकाणी सुद्धा ह्या मंडळीचे शुभेच्छा संदेश (?) आधीच पोहचलेले असल्याने ते पण दाद देत नाहीत. त्यामुळे अनेक सज्जनांना आपले जीव गमवावे लागण्याची वेळ आली असून अनेकांना आयुष्यातून उठण्याची पाळी येत असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या अभंगातील गांडू भडवे आगे चले मर्दो के बेहाल,पतिव्रता भुकी मरे पेढे खाये छिनाल ! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

         पुरोगामी महाराष्ट्राचा नावलौकिक टिकवायचा असेल तर कायद्याची कठोर अंमलबजावणी करून सर्व अवैध व्यवसायीकांच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे. मात्र एरव्ही एकमेकाचे विरोधक असणारे राजकारणी अवैध व्यवसायात मात्र गळ्यात गळे घालून मिरवत असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची हाच खरा यक्षप्रश्न आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग जन्मावे पण शेजारच्या घरात अशी प्रवृत्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या