कोरोना : भय नको सजगता हवी - डॉ. दिलीप पुंडे

सद्याची कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आपण आता दुसऱ्या कम्युनिटी स्प्रेडच्या लाटेमध्ये  आहोत. महाराष्ट्रात कोरोनाच्या जवळपास पन्नास हजारांहून अधिक केसेस दररोज येत आहेत. नांदेड जिल्ह्यातही खूप गंभीर रुग्ण आहेत. परिस्थिती अशी आहे की रोज पेपर मध्ये, व्हाट्सअपवर  किंवा सोशल मीडियामध्ये मृत्यूच्या आणि श्रद्धांजली च्या बातम्या पाहून-ऐकून मन खिन्न, विषन्न होत आहे. कितीतरी जवळचे नातेवाईक, मित्र, स्नेहीजन आपण गमावत आहोत. या वेळेचा कोरोना फार भयानक आहे. मागील लाट आणि या वेळच्या लाटेमध्ये खूप फरक आहे. या वेळेच्या लाटेमध्ये आपण पाहिले तर कोरोना हा बहुरुप्या सारखा रुप बदलून येत आहे. 

यावेळेसच्या लक्षणात थोडाफार बदल, वेगाने प्रसार आणि मृत्यूदर ही खूप जास्त आहे. Oxygen Bed,ICU बेड व औषधींचा तुटवडा व त्यातून रुग्णांची व नातेवाईकांची होणारी हालअपेष्टा ही अत्यंत खेदजनक व वेदनादायी बाब आहे. रुग्ण झपाट्याने गंभीर होत आहेत.  रोज वाढणाऱ्या केसेस व मृत्यू पाहता स्मशानभूमीतही प्रतीक्षा यादी लागते आहे. घडू नये ते घडतं आणि कोरोनाचं मरण पाहून सरण सुद्धा रडतं ।।  अशा दुर्दैवी परिस्थितीचा सामना आपण करत आहोत. शासन-प्रशासन, आरोग्य यंत्रणा, इतर सेवाभावी संस्था, मीडिया इ. अनेक जण या कोरोना नियंत्रणासाठी गेल्या एक वर्षापासून सतत झटत आहेत आणि अनेक संघटना हतबल, असाह्य झाल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला आहे. अखंड,  अविरत व अथक परिश्रम  या सर्व संस्थांमार्फत होत आहेत तरी पण कोरोना नियंत्रणात येत नाही. अख्खं जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. राज्यात हा वेगाने वाढणारा कोरोना संसर्ग व मृत्युदर  पहाता ही *आरोग्य आणिबाणी वाटते*. प्रत्येकाच्या आयुष्यातील ही पहिलीच मोठी साथ समजायला पाहिजे. आपण यावर नियंत्रण का आणू शकत नाही हा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. मागील एक वर्षापासून जनजागरण केले असले तरी अजूनही जागरुकता येत नाही. बेफाम, बेलगाम, बेजबाबदारपणे लोकं रस्त्यावर शासकीय सूचना नियम चे पालन न करता राजरोसपणे पणे फिरत असतात आणि इतरांना ते या साथीच्या आजाराचा प्रसार देत असतात. या साथीच्या आजारांसाठी अनेक जण डॉक्टरांकडे जातात आणि त्यांना कोरोनाची टेस्ट करा म्हटलं की त्यांची टेस्ट  करायची मनाची तयारी नसते.

समाजातील अप्रशिक्षित किंवा कोव्हिडं विषयी पुरेसे ज्ञान नसलेल्या व अनुभवाचा अभाव असलेल्या काही मंडळी कडून सौम्य लक्षणे असलेले रुग्ण तपासून घेतात व औषधोपचार सुरू  होतो पण या दरम्यान कालावधीत वेळ जाऊन पुढे रुग्ण गंभीर अत्यवस्थ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वेळ न दवडता लक्षणे जाणवताच रुग्णाने तात्काळ कोव्हिडं विषयी तज्ञ डॉक्टरां कडून मार्गदर्शन घ्यावे व तपासण्या करुन घ्याव्यात.

 ते म्हणतात -  मी शेतात राहतो, मला कोरोना होऊ शकत नाही,  मी थंड पाणी प्यायलो,मला उन लागले, मी पंख्याखाली बसलो, मी कुलरला बसलो होतो म्हणून सर्दी झाली... असे थातूरमातूर उत्तर देत असतात .निदान न स्वीकारणे ही हल्ली रुग्णांची प्रवृत्ती झाली आहे. त्यांना मी गेल्या काही महिन्यांपासून पाहत आहे. यामध्ये या महिन्यात तर मृत्यूदरानं उच्चांक गाठलाय, यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. ही परिस्थिती खूप भयावह आहे. यातून मार्ग नाही काढला तर आपण कुणीकडे जाऊ हे निश्चित सांगता येत नाही. आजपर्यंत असं होतं की जो जीता वही सिकंदर... पण दुर्दैवानं साथ अशीच राहिली तर,  जो जिंदा वही सिकंदर म्हणायची वेळ आपल्यावर येईल. 

आरोग्य  हे पाच  टप्प्यात विभागल्या गेलेले आहे. (five levels of Health) 

आपणास आजार होऊ नये म्हणून आधीच का प्रयत्न करू नये ?  प्रतिबंध हाच खरा उपाय - Prevention is better than cure चांगल्या आरोग्यासाठी आहार, विहार, व्यवहार,  मनःशांती ही  चतुःसुत्री आहे. विहार सध्या बंद असला तरी  काही लोकं बेजबाबदारपणे व सैराटवृत्तीने फिरताना आपण पाहतो. खरं म्हणजे माझ्या मागील एक वर्षाच्या अनुभवातून मला स्वतःला असं वाटतं की आज आपल्या हातात SMS या त्रिसूत्री शिवाय काहीच नाही. फिजिकल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री पाळली तर खरंच आपण कोरोना नियंत्रणात आणू शकतो, हे मी कोरोनाच्या मागील एक वर्षाच्या  अनुभवातून व सध्याच्या रौद्र रुपावरुन सांगतोय. मास्क इज द ओन्ली टास्क - ही त्रिसूत्री जोपर्यंत आपण पाळणार नाही तोपर्यंत आपण काहीही करु शकणार नाही. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार थांबेल.गृहविलगीकरण दरम्यान रुग्णाला तज्ञ डाँक्टर्स कडून समुपदेशन होणे आवश्यक असून लक्षणे ,त्रास याबाबतीत माहिती आदानप्रदान  झाल्यानंतर रुग्णाचे मनोबल वाढेल.

 आपणही जगलं पाहिजे आणि इतरांनाही जगवलं पाहिजे, जगा आणि जगू द्या* हा मंत्र आचरणात आणण्याची खरी गरज आज आहे. कर्णाला जशी कवच-कुंडलं होती, तसं *मास्क हेच आपलं सद्याचं खरं कवच-कुंडल आहे.  मास्क वापरणे म्हणजे ते कवच-कुंडलं ठरणार आहेत. आजमितीस तरी  जगात कोरोनासाठी नेमके औषध उपलब्ध नाही त्यामुळे  स्वतःचे आरोग्य कसे अबाधित राहिल, मी आजाराकडं कसा जाणार नाही याचा विचार करून कृती करणे गरजेचे आहे. तसेच हल्ली ताणतणावाचं व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अख्खं जग ताण-तणावात आहे. ध्यानधारणा,  मनःशांतीसाठी इतर मार्ग आहेत. रोज मृत्यूच्या,  निगेटिव्ह बातम्या,  श्रद्धांजलीच्या पोस्ट पाहून मनामध्ये भय, डिप्रेशन, विषन्नता, खिन्नता येते. Few minutes of meditation will prevent years of medication. काही मिनिटाचं ध्यान हे काही वर्षांची औषधं पुढे ढकलू शकते. हा झाला पहिला टप्पा म्हणजे - *हेल्थ प्रमोशन.

दुसरा टप्पा आहे - Specific Protection म्हणजे विशेष सुरक्षा आणि यात येतं *लसीकरण.* भारतात लसीकरण मोहीम वेगाने चालू आहे. १३० कोटींचा आपला देश म्हणजे लसीकरणासाठी बराच कालावधी लागू शकतो. भविष्यात अनेक लसींना परवानगी मिळेल. मिळेल ती लस घ्या.  *लसीचा डोस घेतल्यानंतर कोरोना होणारच नाही याची काही शाश्वती नाही पण झालाच तर तो अति गंभीर रूप धारण करणार नाही आणि रुग्णांना मृत्यू पर्यंत नेणार नाही हे मात्र निश्चित.* मी तुम्हाला आव्हान करतो की लसीच्या बाबतीमध्ये समज किंवा गैरसमज न बाळगता लस घ्यावी.एखाद्या रुग्णाला ताप येणे, डोके दुखणे अशा तात्पुरत्या स्वरूपात काही गोष्टी घडू शकतात,  पण आज Specific Protection म्हणून लस हेच हत्यार आपल्या हातात आहे. पोलिओ, देवी आदि आजारांवर आपण लसीकरणातूनच  विजय मिळविला आहे. पोलिओमुक्त भारत, देवी मुक्त भारत हे सारे लसीकरणाचेच श्रेय आहे. आजमितीस शासन आरोग्य यंत्रणा मार्फत लसीकरण करीत आहे. लसीकरण करून घ्यावे असे मी सर्वांना आव्हान करतो.

तिसरी पायरी आहे - Early detection and treatment* - लवकरात लवकर निदान आणि उपचार आवश्यक आहे. तुम्हाला थोडीफार लक्षणं आली तर तुम्ही घरी बसू नका. सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, संडास लागणे, दम लागणे, खोकला येणे, प्रचंड अशक्तपणा येणे, भूक न लागणे,चव जाणे ही कोरोनाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. कोविड निदानासाठी Rapid Antigen test, RTPCR , HRCT Chest व रक्तचाचण्या  केल्या जातात.आपण जेवढा उशीर करू तेवढ्या झपाट्याने हा कोरोना फुफ्फुसामध्ये जातो आणि रुग्णांचा एचआरसिटी म्हणजे (छातीचा सिटीस्कॅन) चा स्कोर दहा-बारा किंवा त्यापेक्षाही जास्त होतो,  तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि रुग्ण दगावन्याचे प्रमाण वाढते.हे टाळण्यासाठी लवकरात लवकर निदान करणे आवश्यक आहे.  सद्यस्थितीत कोरोनावर रेमडेसीव्हीर, स्टेरॉईड इ. उपचार पद्धती आहेत.- *गरज ही शोधाची जननी असते या उक्तीनुसार नेमक्या औषधाचा शोध भविष्यात लागेल, यासाठी जगातील शास्त्रज्ञ अविरतपणे प्रयत्न करत आहेत.  आजार अंगावर काढणे म्हणजे गंभीर आजाराला निमंत्रण देणे आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा,  डॉक्टरांचा सल्ला घ्या विनाकारण डॉक्टर बदलण्यापेक्षा योग्य सल्ला घेणे योग्य.  

चौथी जी लेवल आहे तिला म्हणतात  Disability limitation म्हणजे विकलांगता येणार नाही- यासाठी प्रयत्न करणे. कारण काही आजार असे असतात कि माणूस दुरुस्त झाला तरी तो पुर्णतः बरा होऊ शकत नाही. उदाहरणार्थ ज्याचा अर्धांगवायू दुरुस्त झाला तरी तो माणूस मरेपर्यंत विकलांग राहतो.  असे अनेक आजार असतात आणि हा कोरोना झाल्यानंतर त्यात कांहीं अवयव निष्क्रिय होऊन त्याच्या मधून पुन्हा विकलांगता येऊ नये यासाठी जेवढ्या लवकर तुम्ही उपचार करून घेता, तेवढ्या लवकर तुमचं शरीर पूर्ववत होईल आणि विकलांगता येणार नाही आणि पूर्ववत जीवन जगता येईल.

कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णाला पुढच्या टप्यात अनेक दीर्घ कालीन आजाराला सामोरे जावे लागत आहे असे निदर्शनास आले आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, अपचन, भूक न लागणे, दीर्घकाळ खोकला, असे लक्षणे दिसून येत आहेत पोस्ट कोव्हिडं हॉस्पिटलमध्ये उपचार करवून घ्यावेत मानसिक ताणतणाव नैराश्य मध्ये न राहता सकारात्मक आणि तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जागतिक पातळीवर कोरोना बाबत युद्धपातळीवर संशोधन उपचार पद्धती बाबत सखोल अभ्यासस सुरू आहे एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी  सर्वांनी प्रयत्न करावेत 

यानंतर शेवटचा टप्पा आहे Rehabilitation म्हणजे पुनर्वसन म्हणजेच Back to chair. एखादा रुग्ण गंभीर आजारातून बाहेर येत असेल,  बाहेर आला असेल तर तो पूर्ववत कामावर गेला पाहिजे.   प्रत्येक आजारातून माणूस जर बॅक टू चेअर आला तर  त्याचा रोजगार टिकेल आणि त्याचे कुटुंब व्यवस्थित सुरळीत राहील. 

 कोरोना नियंत्रण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. शासन-प्रशासन, आरोग्य यंत्रणा यासह सर्वांची जबाबदारी आहे, असं मला वाटतं.  This is a universal responsibility. सामुहिक हक्क जसे असतात तशी सामुहिक जबाबदारी पण असते. कुठल्याही चळवळीचे सूत्र असतं, तुम्ही-आम्ही आणि मी.  शेवटी ही चळवळ यशस्वी करायची असेल तर कोरोनाच्या बाबतीमध्ये हे सूत्र उलट म्हणजे  पहिल्याप्रथम *मी, आम्ही* व तुम्ही यानुसार हे सूत्र आपण अंगीकारले पाहिजे. जोपर्यंत आपण जबाबदारीने जाणीवपूर्वक वर्तन करणार नाही तो पर्यंत परिवर्तन होणार नाही हा तर सिद्धांत आहे. ही माझी जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्याशिवाय हा कोरोना नियंत्रणात येणारच नाही. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे १००% तंतोतंत पालन केल्यासच ही कोरोनाची शृंखला तुटेल अन्यथा कोरोनाच्या अशा अनेक लाटा येतील अन्  मानव जातीची अपरिमित हानी होईल. 

साथी हात बढाना, मिलकर बोझ उठाना... या उक्तीप्रमाणे कुठलाही एक माणूस किंवा कुठलीही एक यंत्रणा हे मानवजातीवर आलेलं महासंकट टाळू शकत नाही.केंद्र सरकार, राज्य सरकार , जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा इ. अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मानव जातीवर आजपर्यंत अनेक संकटं आली, प्रत्येक संकटाला तारुन माणूसच त्यातून पुढे निघाला आहे, हेही संकट जाईल.  

होऊ देत सुखी सारे,

सर्वां आरोग्य लाभू दे |

पाहू देत मांगल्य सारे,

न कोणा  दुःख होऊ दे ||

अशी आशा आपण बाळगूयात आणि या कोरोना महामारी नियंत्रणासाठी एक सर्वंकष प्रयत्ना़ंची शृंखला निर्माण करु या.. 

     हे महाकाय संकट दूर करायचं असेल तर,  प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल ,नाही तर पुढे कोण राहील आणि कोण राहणार नाही याची शाश्वती नाही पण आपण आशावादी राहुया, let us hope for the best. संकटं येतात आणि जातात पण  जबाबदारीची जाणीव झाल्याशिवाय संकटाचे निवारण होणार नाही. मी सर्व जनतेस आवाहन करेन,  कोरोनाचा समुळ नायनाट करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. जबाबदारीची जाणीव झाल्याशिवाय हे शिवधनुष्य पेलल्या जाणार नाही. आपणास चितेची धग नको पण सजगतेची उब हवी

यासाठी भय न बाळगता सजग व्हा,सजग राहा आणि  सदैव सजग राहा.

मित्रांनो हे माझं वैयक्तिक मत आहे याचा जरूर विचार करावा ही नम्र विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.

 डाॅ. दिलीप पुंडे,

       MD,Medicine

सदस्य : सर्पदंश तज्ञसमिती, जागतिक आरोग्य संघटना (WHO)

पुंडे हॉस्पिटल,मुखेड, जि.नांदेड.

E-mail: drpundedp@gmail.com

संवाद: 9422874826.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या