वाजेचा लेटरबॉम्ब शिवसेनेच्या अनिल परबच्या माथी !


 

अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन ह त्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची NIA कडून चौकशी सुरू आहे. या तपासणीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझेने स्वतः लिहिलेलं एक पत्र NIA ला दिलं आहे. या पत्रात त्यांनी महाविकास आघाडीच्या ३ मंत्र्यांची नाव घेतली आहेत. मागील अनेक दिवसांपासून विरोधकांनी तिसरा मंत्री राजीनामा देणार असा दावा केला होता. आता वाझेने तिसरे नाव घेतल्याने हा मंत्री म्हणजे शिवसेनेचे अनिल परब आहेत का असा प्रश्न समोर आला आहे.

सचिन वाझेने या पत्रात ३ गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल देखील लिहिलं आहे. निलंबित असलेल्या सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी शरद पवार यांचा विरोध होता. त्यामुळे अनिल देशमुख यांनी आपल्याकडे २ कोटी मागितले आणि आपण शरद पवारांना समजावू असे सांगितले.

शिवाय अनिल देशमुख यांनी आपल्याला ऑक्टोबर २०२० मध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बोलावले होते. या भेटीत देशमुख यांनी मुंबई शहरातील १६५० रेस्टोरंट आणि बारकडून वसुली करण्यास सांगितले होते. पण आपण हे आपल्या क्षमतेबाहेर असल्याचे म्हंटले होते असं सचिन वाझेने आपल्या पत्रात लिहिलं आहे.

त्यानंतर वाझेंनी अनिल परब यांच्याबाबत पत्रात दावे केले आहेत. जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. दरम्यान डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUT या ट्रस्टबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर ट्रस्टींना विश्वासात घेऊन चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT कडून ५० कोटी रुपये मागण्यास सांगितले होते. SBUT बद्दल माहिती नसल्याने वाझेंनी हे काम करण्यास नकार दिला. त्याचबरोबर त्या चौकशीवरही आपले कोणतंही नियंत्रण नाही, असे वाझे यांनी पत्रात म्हटलं आहे.



दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने CBIला दिले आहेत. या प्रकरणात आता NIA बरोबरच आता CBI कडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

सचिन वाझेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय घोडावत यांनी गुटखा प्रकरणाची चौकशीस मदत करण्यास सांगितल्याचा तिसरा आरोप या पत्रात केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या