पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

 


 जि.अहमदनगर

 हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान . याच गावात ३१ मे १७२५ रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला .पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव यांच्याशी वयाच्या ८व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.अहिल्यादेवी बालपणापासूनच चाणाक्ष, तल्लख व कुशाग्र बुद्धीच्या होत्या.खंडेराव राज्यकारभारावर अजिबात लक्ष देत नव्हते. पण अहिल्याबाईनी कधीही तक्रार न करता सासरे मल्हारराव यांनी  नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या सुनबाई यांचेवर सासरे मल्हारराव होळकर यांचा मोठा विश्वास होता.आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाई वर सोपवत असत.अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.  कुंभेरीच्या लढाईत पती  खंडेराव मरण पावले .त्यावेळी  सासरे  मल्हारराव म्हणाले " माझा खंडूजी गेला म्हणून काय झाले  तुझ्या रुपाने माझा खंडुजी  अजून जिवंत आहे तू सती जाऊ नकोस" अहिल्यादेवीने ते ऐकले.व मल्हाररावांनी अहिल्यादेवींच्या हाती सत्तेची सूत्रे दिली.

           मल्हारराव होळकरांचे सन. १७६६ मध्ये निधन झाले .त्यानंतर अहिल्याबाईंच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडली .अहिल्याबाई् यांचे पुत्र मालेराव यांना जरी सुभेदाराची वस्त्रे मिळाली असली तरी ती सांभाळण्याचे त्यांच्यात धाडस नव्हते .लवकरच त्यांचे देहावसान झाले.अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्त्या झाल्या. पुढील २८ वर्षे त्यांनी राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालवला.आपल्या  तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.

        

       अहिल्याबाई या एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या.पूर्वीच्या कायद्यामध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील - कुलकर्ण्यांच्या वतन हक्काचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले.त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भिलवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा अहिल्याबाईनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर  घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडीक जमिनीची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली.आणि जमीन करार पट्ट्यांने देण्याची पद्धत सुरू केली.

         अहिल्याबाई यांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलवली. सन.१७७२ मध्ये त्यांनी अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर बांधले .नदीला घाट बांधले. मंदिराचा जीर्णोध्दार केला व पूर्वज्यांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते .अहिल्याबाईनी वस्त्रोद्योगास चालना दिली.कोष्टी लोकांची वसाहत स्थापन केली. आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली.अहिल्याबाईंचा मूळ स्वभाव सौम्य असला,तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंग सारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली.

           अहिल्याबाई यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव सगळ्या हिंदुस्तानात घेतले जाई. त्यांनी अन्नछत्रे उघडली. राज्यात विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधून घेतल्या.जनावरांसाठी डोण्या 

   बांधून घेतल्या.पशुपक्ष्यांसाठी रूग्णोपचारांची व्यवस्था केली.सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम - वैद्य नेमले . स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी, बंदिस्त ओवर्व्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता.गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.

                नाशिक मुंबई रस्त्यावर इगतपुरीजवळ कसारा  घाटात अहिल्याबाई होळकरांनी यात्रेकरूंची सोय व्हावी म्हणून एक पाणवठा बांधलेला आहे. बाजूचा परिसर हा जंगलमय असल्यामुळे गुरेढोरे व जंगली जनावरे विहिरीत पडू नयेत म्हणून त्यांनी विहिरीला टोप केला आहे. विहीर बांधकामातला हा एक अद्भुत नमुना म्हणून याकडे पाहता येईल. आयुष्यभर सर्वसामान्यांची सेवा करण्यामध्ये अहिल्याबाईंनी आपले आयुष्य वेचले. स्वतःची पर्वा न करता दुसऱ्याचे आयुष्य सुखकर कसे करता येईल, याकडे त्यांनी नेहमी लक्ष पुरविले.

       अहिल्याबाईनी आयोध्या , नाशिक,  द्वारका , पुष्कर ,जेजुरी,पंढरपूर, ऋषिकेश,गया , उदयपूर, चौंडी येथे मंदिरे बांधली. याशिवाय सोरटीसोमनाथ, ओमकारेश्वर ,मल्लिकार्जुन ,औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर ,विष्णुपद, महाकाळेश्वर,आधी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

       वाराणसी,प्रयाग, पुणतांबे ,चौंडी , नाशिक ,जांब , त्रिंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर , उज्जैनी ,रामेश्वर ,भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली .चारधाम या ठिकाणी घाट, बाग ,मंदिरे,कुंडे ,धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली.  शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेली मंदिर बांधले व कुंभेरीयेथे पती खंडेरायाच्या स्मरणार्थ छत्री बांधली.

          अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू ,द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मधुरा महात्म , मुहूर्त चिंतामणि,वाल्मिकी रामायण    पद्मपुराण,श्रावणमास माहात्म इत्यादी ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती होत्या.विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे  मानसन्मान दिला जाई. मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.

      

        एका छोट्याशा गावात सामान्य कुटूंबात

       जन्माला आलेली मुलगी आपल्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तर भारतात राज्यकर्ती बनू शकल्या. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्य बरखास्तीचा डाव राघोबा पेशवे यांनी आखला होता तोसुद्धा  चाणाक्ष व धुर्तपणे अहिल्याबाई होळकर यांनी ऊधळून लावला. 

           महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन   

  आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच  होते. त्यांच्या  प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत . व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे २७वर्षे राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे  याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही  अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी  चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. अहिल्याबाईंचा नंतर महेश्वर येथे १३ आॅगस्ट १७९५ ला वृद्धापकाळाने निधन  झाले

  🙏 "अशा या थोर ,कर्तबगार, पराक्रमी "पुण्यश्लोक "अहिल्याबाई होळकर यांना  जन्मदिनानिमीत्त  विनम्र अभिवादन 🙏

                           

                   लेखन ✒️

       डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या