आरोग्य विभागात मेगाभरती! १६ हजार पदांसाठी निवडप्रक्रिया होणार ! कोरोना पार्श्वभूमीवर निर्णय.

 राज्यात करोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण १२ हजार पदं, ब वर्गातील २ हजार पदं आणि २ हजार विशेषज्ञांचा समावेश असणार आहे. येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे करोनामुळे बेरोजगारी किंवा आर्थिक अडचणीचा सामना सुरू असताना हा काही प्रमाणात दिलासा मानला जात आहे.

 

दरम्यान, यासंदर्भात पुढील निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. “मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सांगितलं की रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची आवश्यकता आहे. कॅबिनेटने ठरवलं आहे की आता आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाईल. तसेच. तातडीने परीक्षा घ्याव्यात असं देखील ठरवण्या आलं आहे”, असं टोपे म्हणाले.

कोणत्या वर्गासाठी किती जागांची भरती केली जाईल, याची देखील माहिती राजेश टोपे यांनी दिली. “१२ हजार क आणि ड वर्गातील जागा, २ हजार ब वर्गातील डॉक्टर-मेडिकल ऑफिसर आणि २ हजार स्पेशालिस्ट यांच्या जागा भरण्याचा निर्णय आपण घेत आहोत. त्याची शासन स्तरावरील कारवाई आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर क आणि ड वर्गासाठी एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून ब वर्गाच्या मुलाखती घेतल्या जातील. तर अ वर्गासाठीचे सिलेक्शन एमपीएससीकडे पाठवले जातील”, असं टोपे यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या