गोविंद नांदेडे यांच्या हस्ते प्राथमिक शिक्षक मिलिंद कंधारे लिखीत ‘आत्मार्त’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

 


नांदेड  | भावार्थ असलेल्या ‘आत्मार्त’ या  काव्यसंग्रहातील कवितांमधील शब्द म्हणजे मानवतेच्या उत्थानाची परिक्रमा असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केले. वाई बाजार (ता. माहूर ) येथे आयोजित ‘आत्मार्त’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनसमयी ते बोलत होते.


जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक असलेल्या मिलिंद कंधारे यांच्या सामाजिक परिस्थितीवर आधारीत ‘आत्मार्त’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन वाई बाजार येथील व्यंकटप्रभू फँमिली रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी आपल्या कल्पक आणि अद्वितीय भाषणशैलीतून काव्यसंग्रहासह चौफेर भावनिक फटकेबाजी करताना उपस्थितांची अक्षरश: मने जिंकली. दरम्यान सामाजिक मूल्यांची पेरणी करण्याचा भावार्थ असलेल्या ‘आत्मार्त’ या  काव्यसंग्रहातील कवितांमधील शब्द म्हणजे मानवतेच्या उत्थानाची परिक्रमा असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केले. तर विष्णूकवींच्या भूमीत बहिणाबाई पासू ते तुकोबारायांपर्यंतच्या विचारांना उजाळा देत तसेच  बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपदेशाची आठवण उपस्थितांना करून दिली.


    दरम्यान ‘आत्मार्त’ काव्यसंग्रहाचे कवी मिलिंद कंधारे (हृदयाक्षर) यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना  प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष गोविंद नांदेडे पुढे म्हणाले की, कवितेतील शब्द हे परिसरातील सर्व शाळांमध्ये रुजले जाऊन आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील वाडी, तांडा, गाव व पाड्यांमधील विद्यार्थ्यांना यामुळे  समानतेचे, निष्ठेचे व मानवी मूल्यांचे शिक्षण मिळण्यास मदत होईल. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून अप्ररत्यक्षपणे भावनिक आवाहन करताना ते म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर एखादी फाइल आली असता त्या अधिका-याला त्या फाईल मध्ये पैसे दिसायला नकोत  तर त्यात अडल्या नडल्या त्या गरीब व्यक्तीची दारिद्री, नैराश्य, निरागसता व समस्येने ग्रस्त झालेला चेहरा दिसावा असे भावनिक आवाहन करून उपस्थितांची मनेे अक्षरश: हेलावून सोडली.


  यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य समाधान जाधव यांच्यासह तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, हाजी कादरभाई दोसाणी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौव्हाण, सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र रोटे, मराठी गझलकार अबेद शेख, साहित्यिक डॉ.राम वाघमारे, चित्रकार रणजीत वर्मा, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक एस.एस.पाटील, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव, गटसमन्वयक संजय कांबळे, कवी सागर चेक्के, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांची उपस्थिती होती.


 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साजीद खान यांच्यासह डॉ.मोफिक खान, गंगन्ना पोलासवार, अजय कुमार कंधारे, मुनेश्वर थोरात, रुपेश मोरे, विजय खडसे, शैलेश पारधे, अनाथपिंडक कंधारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवी मिलिंद कंधारे यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक आनंद सरतापे तर आभार प्रदर्शन संगीतकार भोला सलाम यांनी केले.

हे ही वाचा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या