सावित्री सत्यवान कथासार - सकारत्मक कथा संदेश. - पुरुषोत्तम खेडेकर चिखली .

 + सावित्री सत्यवान कथासार +


जय जिजाऊ भगिनींनो व बांधवांनो ,

आपणास वट सावित्री पौर्णिमा निमित्ताने खूप खूप शुभेच्छा ..

मित्रांनो , माझा हा संदेश वाचून कदाचित आपल्या पैकी बहुतेकांनी आश्चर्य व्यक्त केले असेल असे मला वाटते . भारतीय समाज जीवनातील बहुजन समाजाला गुंतवून ठेवणारे सण उत्सव महोत्सव व्रत वैकल्ये उपवास पौर्णिमा इत्यादी अनेक बाबींचे विकृतीकरण/ब्राह्मणीकरण झालेले आहे हे लक्षात घेणे . 

मित्रांनो , सावित्री सत्यवान कथा खरी की खोटी की काल्पनिक की प्रक्षिप्त की मिथक हे वाद आहेत . आपणही अजाणतेपणी आपल्या सोयीनुसार प्रहार करत असतोच . तर एकीकडे आपल्या दैनंदिन जीवनात चित्रपट कादंबरी नाटके कथा सिरियल शिल्प इत्यादी माध्यमांतून यापेक्षाही अधिक अतार्किक अविवेकी विचार पोसत असतो  . परंतू आपण ते जसेच्या तसे न स्वीकारता फिल्टर - गाळून घेतो . चर्चा करतो . असे लक्षात येते .



सावित्री सत्यवान कथा...

मित्रांनो , सावित्री सत्यवान मूळच्या कथेतील सावित्री ही अत्यंत सुंदर बुध्दीमान रुपवती व वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणारी राजकन्या होती . ती अंधश्रध्दा वादी नव्हती . ज्योतिष भविष्य नाकारणारी होती . पंडित पुरोहित भटजी राजोपाध्ये बुवा ज्योतिषी यांना खोटे पाडणारी होती . ब्रह्मशाही भ्रमशाही भटशाही भयशाही या जंजाळात अडकलेली नव्हती . वेदिक ब्राह्मणी वर्चस्वाला नाकारणारी होती . स्वाभिमानी व स्वतंत्र विचारसरणी जोपासणारी सशक्त तरुणी होती.  सत्य वादी होती . हे प्रथम लक्षात घेणे .

मित्रांनो , परंतू दुर्दैवाने जे आपल्या इतिहासाचे झाले . तोच प्रकार या सावित्री सत्यवान कथेबाबत झाला आहे असे मानायला हरकत नाही . बहुजन समाजातील स्रियांच्या मनावर एवढी खोलवर रुतलेली ही कथा निश्चितच विकृत स्वरूपात उपलब्ध आहे असे वाटते . ही कथा बहुजन समाजाला पोषक असावी . परंतू तिचे विकृतीकरण करण्यात आले आहे . आज आपण जिवंत आहोत . तरी आपण दररोजच्या जीवनात सत्याला असत्य ठरविणारे अनेक किस्से घडत असतात . भारतीय राजमुद्रा " सत्यमेव जयते " अशी आहे . पण सत्यवादी समाज तसे न म्हणता , " सत्य एकमेव जळते !! " असे म्हणतात !! यावरून आपल्याला सावित्री सत्यवान नावाच्या कथेचे हजारो वर्षांत काय झाले असेल ?? याची कल्पना करता येते .. 

मित्रांनो , सावित्री सत्यवान आपल्याला माहीत असलेली कथा साधारण अशी आहे ...

प्राचीन काळी मद्र नावाचा एक देश होता . तेथे अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता . त्याला सावित्री नावाची एकमेव अत्यंत सुंदर , बुध्दीमान व स्वाभिमानी कन्या होती . तिचा जन्म झाला तेव्हा सर्व राजोपाध्ये ज्योतिषी भाट यांनी तिच्या उज्वल भविष्याची कुंडली सांगितली . सावित्री वयासह रुप , बुध्दी , राज्यकारभार यात आपली छाप निर्माण करत होती . तिचे लग्नाचे वय झाले .  तिला भाऊ नव्हता . त्याकाळी भाऊ नसलेल्या मुलीशी सहजासहजी कोणी मुलगा लग्न करत नसे . त्यातल्या त्यात सावित्री सर्वगुणसंपन्न विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणारी ताठ राजकन्या होती . त्यामुळे कोणीही राजपुत्र स्वयंवरात सहभागी होत नसे . या कारणाने तिचे लग्न होत नव्हते . शेवटी तिने स्वत:च्या लग्नाचा निर्णय स्वत: घेतला . एका निर्धन , बेरोजगार , सत्ताहीन युवकास तिने नवरा म्हणून निवडले . पण नारदासह सर्व ज्योतिषांनी सांगितले की सत्यवान एक वर्षात मरणार आहे . तेंव्हा या सत्यवान सोबत लग्न करु नकोस . 


मित्रांनो , तुम्ही विचार करा की आज तुमच्या मुलामुलीसोबत असे  घडले तर तुम्ही किंवा तुमची मुले कोणता निर्णय घेतील ?? सावित्रीने नारद व पुरोहितांना जाहीरपणे प्रश्न विचारले . ते असे .....

 (१) माझ्या जन्माच्या वेळी तुम्ही सांगितलेले भविष्य खोटे होते काय ? 

(२) मी व सत्यवान अजून विवाह बंधनात नाही . मला हे सांगा की मी विधवा होणार आहे काय ?

 (३) मी माझ्या वडिलांसाठी अपशकुन आहे काय ? 

नारद तिच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाही . पण असे काही प्रश्न विचारले होते हे अनेकांना माहीत नाही . ही सावित्री महिलांना माहीत नाही . ही सर्वार्थाने प्रगतशील , पुरोगामी , धैर्यशील , स्वाभिमानी , बुद्धीप्रामाण्यवादी सावित्री आजच्या महिलांनी व पुरुषांनी समजून घेणे गरजेचे आहे अशी विनंती आहे .


मित्रांनो , सत्यवान एका वर्षात मरणार आहे हे ऐकून सावित्री डगमगली नाही .  तिने जिद्दीने सत्यवानास निवडले व  त्याच्यासोबत लग्न केले होते . ही कथा सर्वांनीच ऐकलेली वाचलेली आहे . याच सावित्रीने स्वबळावर व स्वकौशल्यावर आपल्या सासरच्या व बापाच्या कुटुंबांची भरभराट होईल असे काम केले होते . 

आज वट सावित्री निमित्ताने आपल्या पैकी बहुतेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या असतील . पण माझी विनंती आहे की कृपया आपण या कथेतून काही सकारात्मक विचार स्विकारायला हरकत नाही . आम्ही भारतीय समाज जीवनातील अविभाज्य भाग झालेल्या व अगदी आपल्या कुटुंबात रुजलेल्या काही सण उत्सव तसेच विधी विरोधात टोकाची भूमिका घेत असतो . या कारणाने आपलेच बांधव व कुटुंब दुरावतात . ब्राह्मणवादी विचार व काम नाकारलेच पाहिजेत . मराठा सेवा संघाचे मत आहे की आपण आपला समृद्ध वारसा केवळ कोणी ब्राह्मणांनी स्पर्श केला आहे याच कारणामुळे नाकारु नका . भगवा रंग , कमळ , ज्योत , शिव , देवी असे शेकडो अवेदिक कृषी परंपरेतील प्रतीके आहेत . आम्ही ते आर एस एस ला बहाल केले आहेत . सावित्रीने केलेले महान कार्य प्रत्येक पुरुषाने गंभीरपणे समजून घेतले तर माझी खात्री आहे की प्रत्येकाला वाटेल की मला सावित्री सारखीच ग्रेट बायको मिळाली पाहिजेत . अर्वाचीन काळात सावित्री ज्योतिबा हे जोडपे इतिहासात प्रसिद्ध झाले आहे . जूनी सावित्री व नवीन सावित्री यांची तुलना करून अनावश्यक उठाठेव करू नये अशी विनंती आहे . आपण अर्धवट माहितीवर हवेत गोळीबार करून वातावरण खराब करत असताना जाणवते .


सामान्यपणे रुढ्या परंपरा अंधश्रद्धा निर्माण , जतन व वाढ कुटुंबातच ज्येष्ठ स्त्रियांच्या माध्यमातून होत असते . त्याचे प्रचार व प्रसार स्थान साधारणतः माय , सासू , आजी असतात . मुलांना लहानपणापासूनच आपल्या घरातील सर्व सण उत्सव महोत्सव व्रत वैकल्ये उपवास पौर्णिमा इत्यादी माहीत होतात . भावनिकतेतून जतन केल्या जाणाऱ्या या बाबी एक दोन पिढीनंतर रूढी परंपरा असे रूप धारण करतात . पुढे ते सणाचे रुप धारण करतात . कुळधर्म कुळाचार होतात ... आणि वाढ झाली की धर्माचे स्वरूप प्राप्त होते. अशा प्रकारे कथा घडतात तशाच न राहता पूर्णपणे बिघडतात . सावित्री सत्यवान कथा हे एक उदाहरण आहे असे मला वाटते .


सावित्री सत्यवान कथा संदेश...

(१) स्त्रि ही मुळातच सर्वार्थाने बलवान व परिवर्तनवादी असते . तिला संधी मिळाली पाहिजेत .

(२) सावित्री सारखी महान बायको मिळाली तर सत्यवानासारख्या सर्व हारा पुरुषाचे ही जीवन सुखी समृद्ध होऊ शकते .

(३) भविष्य , कुंडली हे थोतांड आहे . अंधश्रध्दा आहे . त्यापासून दूर राहिले तर आपले भविष्य आपण घडवू शकतो .

(४) मुलींनी आपल्या पसंतीचा मुलगा निवडून त्याच्या सोबत लग्न केले पाहिजेत . सुखात संसार केला पाहिजेत . माहेर सासर असा फरक करू नये . 

(५) कितीही वाईट संकट आले तरी न डगमगता त्यास सामोरे गेले पाहिजेत . विजय आपलाच आहे .

(६) विवाहित पुरुषांचे कल्याण त्याची बायकोच करु शकते .

(७) बायकोचा आदर करणा-या पुरूषांच्या जीवनात सुख समाधान समृद्धी व आनंद असतो .

(८) स्त्रियांनी जर विवेक विज्ञान तर्क बुद्धीप्रामाण्यवाद क्षमता जतन केल्या तर सर्वच क्षेत्रात त्या सहज विजयी होऊ शकतात . 

(९) मुलींनी लग्नाच्या वेळी नवरा निवडताना तो खूप श्रीमंत , मोठ्या घराण्यातील , नामांकित कुळातील वा कमावताच पाहिजेत अशी अट घालण्याची गरज नाही . तर आपल्या पसंतीचा सरळ साधा मुलगा निवडून आपला संसार फुलवता येऊ शकतो हाच आत्मविश्वास पाहिजेत . 


सर्व पुरुषांना विनंती आहे की कृपया बायकोला वडाकडे जायची वेळ येऊ देऊ नका . आजपासूनच आपल्या बायकोला वटवृक्ष मानून तिच्या सावलीत सर्वस्वर्गांचे सुख उपभोगत आनंदी संसार संसार करावा हीच अपेक्षा आहे . तीच आपली सावित्री आहे .


++ मित्रांनो , रामायण, महाभारत व अन्य काही भारतीय कथानकातही असे काही निवडक सकारात्मक विचार सापडतात . आम्ही दळण निवडताना धान्य वेगळे करून खडे व कचरा बाजूला सारून फेकून देतो  . त्याच तत्वानुसार आपल्याला कदाचित सर्वच धार्मिक पौराणिक ऐतिहासिक कथानकांबाबत करावे लागेल असे मत आहे . मराठा सेवा संघाने गुढी पाडवा नाकारतांनाच गुढीला भगवा झेंडा हा पर्याय दिला आहे . समाजातील विरोध मावळला किंवा नगण्य झाला आहे . आज मोठा समाज परंपरागत गुढी न उभारता फक्त भगवा झेंडा उभारतात . हा मध्यममार्ग आपण स्वीकारला पाहिजेत . 

मित्रांनो , याचा अर्थ आम्ही नव विचार नाकारायचे असा होत नाही . तर जून्यातील त्रिकालाबाधित सत्य व नवे सत्य याची सांगड घालून वाटचाल करत नवविश्व निर्माण करणे आवश्यक आहे ....

कृपया गंभीरपणे विचार करून योग्य प्रकारे निर्णय घ्यावा ही विनंती आहे . तुर्तास तरी एवढेच पुरेसे आहे . पटले तर नक्किच इतरांना सांगा व कळवावे ही विनंती आहे . 


आपला शिवांकित ,


पुरुषोत्तम खेडेकर चिखली .

संस्थापक अध्यक्ष 

मराठा सेवा संघ .

दिनांक  २३/२४ -६-२०२१ .

वटपौर्णिमा . वटसावित्री पूजा.

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा .


मोबाईल नंबर....

9823693227&9422046997 .

ई-मेल----

pkhedekar.mss@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या