शिवराज्याभिषेक सोहळा



+शिवराज्याभिषेक सोहळा+

सर्व शिवप्रेमी रयतेला ,

अभिनंदनासह जय जिजाऊ .


उद्या ६ जून २०२१ . शिवराज्याभिषेक दिन . जगभरातील सर्व लोककल्याणकारी समाज व राज्य व्यवस्थेच्या समर्थकांसाठी गौरवास्पद क्षण आहे. लोकशाहीतील रयतेसह विविध प्रकारच्या राज्यकर्ते व नोकरशहा  यांच्यासाठी एक अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी दिन . अगदी आनंदोत्सव आहे . अनेक दिवसांपासून सोशल मिडिया वर शिवप्रेमी जनतेच्या एकमेकांना सदिच्छा व्यक्त करणे सुरू आहे . माझ्या कडून आपणास शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . विश्व कल्याण होवो हीच या आनंदी वातावरणात जिजाऊ चरणी प्रार्थना .....


+ आपण सुमारे आठवड्यापूर्वी भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी केली आहे . उद्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे . गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे सुपुत्र जगातील मानवतेचे प्रतिक मानले जातात . रविंद्रनाथ टागोर एकदा जपानच्या भेटीवर गेले होते . तेथे त्यांना भारताची ओळख एकाच वाक्यात सांगण्याचा प्रश्न विचारला होता . त्यावर रविंद्रनाथ टागोर यांनी उत्तर दिले होते की , " भगवान गौतम बुद्ध यांची करुणा व छत्रपती शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी राज्य व्यवस्था हीच आमच्या भारताची एकमेव ओळख आहे . " सर्व भारतीयांना एकत्र करून त्यांच्यात बंधुभाव एकात्मता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणारे हे दोन शेतकरी सुपुत्र आहेत .

 या दोघांच्या कार्यकाळात सुमारे दोन हजार वर्षे पेक्षा जास्त अंतर होते . परंतू दोघांचेही विचार व कार्य पद्धती यात खूप साम्य होते . भगवान गौतम बुध्दांनी गृह त्याग करुन बहुजन हिताय व बहुजन सुखाय विचारधारा स्विकारून समाजातील दुःख निवारण करण्यासाठी आयुष्य घालवले होते . तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या स्वातंत्र्य व सुखासाठी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करून रयतेला दुःख मुक्त केले होते . 

आज जगाला प्रेम बंधुभाव एकात्मता शांतता समता समानता न्याय स्वातंत्र्य याची अत्यंत आवश्यकता आहे . त्यासाठी सर्वांनी मिळून एक सर्वसमावेशक सम्यक दृष्टी ठेवून न्यायबुध्दी वापरत बहुजन हिताय बहुजन सुखाय विचारधारा प्रत्यक्षात आणावी लागेल असे वाटते . 

+ मित्रांनो , सध्या केवळ भारत देशच नव्हे तर जवळपास सर्वच जग एका अनिश्चित परिस्थितीत सापडले आहे . कोरोना महामारी मुळे आम्ही सर्व अडचणीत आलो आहोत . कोरोना व्हायरस नैसर्गिक की मानव निर्मित हा वाद निर्माण झाला आहे . ही भविष्यातील जागतिक युध्दाची तयारी सुरू झाली आहे असे पसरवले जात आहे . भारतात व महाराष्ट्रात आरक्षणाचे राजकारण केले जात आहे . महाराष्ट्रातील मराठा आरक्षण संघर्ष निर्माण झाला आहे . राजकीय पक्ष एससी एसटी ओबीसी ओपन इडब्लूएस वर्गातील समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत .

 दुर्दैवाने आम्ही त्यास बळकटी देणारे कार्यक्रम राबविण्यासाठी काम करत असल्याचे लक्षात येते आहे . महाराष्ट्र शासनाने राज्यात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करणे सहजशक्य होते तेंव्हा मराठा नेत्यांच्या राजकीय स्वार्थापोटी दिले नाही . मराठा समाजातील काही संघटना व सामाजिक राजकीय नेत्यांना हाती धरून मराठा ओबीसीकरण विरोधात अफवा पसरवून गैरसमज निर्माण केले होते . आर एस एस च्या चिथावणीखोर कृती व विचारातून २०१६ मध्ये सकल मराठा क्रांती मोर्चे नावाने मोर्चे काढले होते . साठ मोर्चे काढून मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढण्याचे एक जागतिक रेकॉर्ड निर्माण केले आहे .. परंतू दुर्दैवाने पदरात काही पाडून घेता आले नाही . सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर मराठा समाजाची दिशाभूल केली आहे . मराठा समाजाचा गैरवापर केला आहे . तसेच काही निवडक मराठा संघटनांनी संवैधानिक व कायदेशीर ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता . आज मितीला मराठा समाजातील सामान्य लोकांना इडब्लूएस आरक्षण लाभ घेता येईल असे लक्षात येते . कारण ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मराठा एस इ बी सी आरक्षण रद्द केले आहे ...

त्यापाठोपाठ महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकरीतील पदोन्नती मधील आरक्षण न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार रद्द करणारा आदेश ७ मे रोजी काढला . ही  बाब समाजात असंतोष निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरली . या असंतोषाचे वारे वाहत असतांनाच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिले गेलेले अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले . परंतू याबाबत राजकारण केले जात आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू असलेले ओबीसी आरक्षण सरसकट रद्द करण्यात आले आहे असे गैरसमज करून दिले जात आहेत. अशा रितीने महाराष्ट्रात एससी एसटी ओबीसी व ओपन वर्गातील समाजात आपसात वादविवाद निर्माण झाले आहेत . तर सर्वच राजकीय पक्ष ही आग भडकवत आहेत . ही सामाजिक अस्वस्थता वाढली तर समाजाचे अपरिमित नुकसान होईल असे लक्षात येते . 

मित्रांनो , आरक्षण ही तरतूद समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी राज्य घटनाकारांची अपेक्षा होती . सन १९०२ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी अवलंबलेला मस्तवाल  घोडे दूर ठेवण्याचा मनसुबा आजच्या काळात नजरेआड केला आहे अथवा झाला आहे . नोकरी व शिक्षण तसेच राजकीय आरक्षणाचे लाभधारक तपासले तर असे लक्षात येते की वर्षोनुवर्षे काही निवडक नांवे वा कुटुंबेच लाभ घेत आहेत . असे असतानाही आरक्षणामुळे समाजात निर्माण होणारे मतभेद अथवा वादविवाद वाढविण्यासाठी बहुतांशी हेच निवडक नांवे जबाबदार आहेत .. थोडक्यात आम्ही या पृष्ठभूमीवर उद्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहोत . 

मित्रांनो , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सर्व धर्म जातींचे जमातींचे मावळे मराठा म्हणूनच ओळखले जात होते . एवढेच नव्हे तर अगदी सन १९८० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रातील जातींचे उल्लेख हे मराठा कुणबी , मराठा माळी , मराठा तेली , मराठा न्हावी , मराठा धनगर , मराठा महार , मराठा चांभार , मराठा मांग इत्यादी प्रकारे केले जात होते . थोडक्यात सर्वच जातीतील लोकांना मराठा म्हणले जात असे . तसेच सन १९५० पर्यंत मराठा समाजाचा  समावेश इंग्रजी सत्तेच्या काळी १९४२ पासून आजच्या सर्वच ओबीसी घटकासोबत इंटरमिजियट क्लास मध्ये केला होता . पुढे मराठा समाजाला ओबीसी यादीतून वगळण्यात आले आहे .. 

मित्रांनो , हे मतभेद दूर होणे गरजेचे आहे असे लक्षात येत असले तरी ते प्रत्यक्षात येणे बरेचसे अवघड आहे . पण अशक्य नाही .‌ आम्ही आपल्या हितासाठी विविध प्रकारच्या घटनात्मक आयुधांचा वापर करून योग्य न्याय मिळवून घेणे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण असे करताना एकमेकांना शत्रू म्हणून प्रोजेक्ट केले तर संयमी भूमिका अडचणीची होते .

 राज्यघटनेच्या चौकटीत राहून आपापल्या परीने प्रयत्न करण्यात हरकत नाही . परंतू दुर्दैवाने आम्ही राजकीय पक्षांच्या हातचे बाहुले होतोय की काय ?? असे वातावरण निर्माण झाले आहे . कोणत्याही परिस्थितीत आम्ही वापरले जाऊ नयेत . आज भाजपच्या कोट्यातून बिड शहरात मराठा समाजाला भडकवण्यासाठी एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . माझी मराठा समाजाला नम्र विनंती आहे की कृपया आपण आपल्या सदसद्विवेकबुध्दीचा सुयोग्य वापर करून समाजात बंधुभाव एकात्मता शांतता टिकून राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घ्यावा ही विनंती आहे . 

मराठा आरक्षणाचे वैरी कोणीही एससी एसटी ओबीसी नेते नसून प्रत्यक्षात केवळ आणि केवळ मराठा राजकीय नेतेच आहेत हे लक्षात घेणे. आम्ही इतरांना दोष देणे गैर आहे . यामुळेच आपसातील गैरसमज वाढत जातात . शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असताना आम्ही भगवान गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून पाहू शकतो . दोघांच्याही जीवनातील महत्वाच्या निर्णयप्रक्रियेत सम्यक दृष्टी व सम्यक भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे . या निमित्ताने माझी आपणांस विनंती आहे की कृपया आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे सम्यक भूमिका घेतली तर समाजात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वाटते . 

आम्ही आपल्या अस्मितेचा व हिताचा मुद्दा सांभाळून आपसातील मतभेद दूर करुन बंधुभाव एकात्मता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन बुध्द आणि शिवाजी यांच्या बहुजन मराठा विचारधारेचा सन्मान करु शकतो . याशिवाय काही इतर पर्याय उपलब्ध आहेत .


मित्रांनो , कृपया सोयीचे अर्थ काढून गैरसमज निर्माण करून मतभिन्नता वाढेल असे काही करू नये ही विनंती आहे . परंतू या परिस्थितीत आम्ही जाणिवपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्याची गरज आहे असे मला वाटते . कृपया वाचून घ्यावे व विचार करावा ही विनंती आहे ...

भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून आम्हाला आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी काम करावे लागेल अशी विनंती आहे . हा लेख एक प्रयोग म्हणून पहावा .  छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक निमित्ताने आम्ही हमी देऊ शकतो .. हीच शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने पुढील काळात सदिच्छा ...


पुरुषोत्तम खेडेकर चिखली .

मराठा सेवा संघ .

मोबाईल .. ९८२३६९३२२७ .

दिनांक... ५ जून २०२१ .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या