शिवश्री सचिन चौधरी यांच्या अकाली निधनाने चळवळीचे न भरून येणारे नुकसान

मराठा सेवा संघाचा विचारस्तंभ कोसळल


मराठा सेवा संघाच्या चळवळीने ३० वर्षाच्या कालखंडात जी अत्यंत महत्वाची व बिनीची माणसे निर्माण केली,त्यामधे एक नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ते म्हणजे शिवश्री सचीन चौधरी यांचे.मराठा सेवा संघाच्या सुरुवातीच्या काळापासून या माणसाने सेवा संघाच्या चळवळीला ज्या पध्दतीने वाहून घेतले होते व अहोरात्र सेवा संघाचा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी जी मेहनत व कष्ट घेतले तो माणूस आज आपल्यामधे नसणे यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.सचीन चौधरी यांचे आज चळवळीमधे नसणे म्हणजे चळवळ पोरकी होणे आहे.सचीन चौधरी आज आम्हा सर्वांना सोडून जाणे म्हणजे मराठा सेवा संघाच्या विचाराचा अत्यंत महत्वाचा स्तंभ ढासळणे आहे.ज्या माणसाचा या चळवळीला एक वैचारीक व बौध्दिक आधार होता,जो माणूस चळवळीसाठी थिंक टँक म्हणून राबत होता,जो माणूस प्रसिध्दीपासून पूर्णतः दूर होता,जो माणूस सेवा संघाची चळवळ हेच आपले कुटूंब समजत होता, तो माणूस एका महिन्याच्या आजाराने आमच्यातून निघून जावा यावर आता विश्वास ठेवणे कठीण आहे.               अत्यंतअभ्यासू,चिकित्सक,निष्ठावंत,माहितीचा सागर,सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध,विविध सामाजिक संघटनांसोबत संवाद,संपर्क व समन्वय सारख्या अनेक गुणांनी परिपूर्ण असलेले सचीन चौधरी हे चळवळीचे आधारस्तंभ होते.मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन,सेवा संघाच्या मराठा आरक्षण समितीचे प्रमुख,उत्कृष्ट लेखक,अभ्यासू वक्ते,शांत,संयमी व प्रसंगी आक्रमक होणारे व अतिशय विनय व व्यासंगाने आपली बाजू मांडणारे,अंधारात असलेल्या महापुरुषांचे जीवनचरित्र आपल्या लेखणीतून प्रकाशात आणणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सचीन चौधरी.आपल्या व्यक्तित्वाची छाप पाडणारे सेवा संघाच्या चळवळीत जे लोक आहेत,त्यामधे सचीन चौधरी हे पहिल्या रांगेत होते.असा कोहिनूर हिरा एकाएकी चळवळीला सोडून जाणे हे कधीही भरुन न निघणारे नुकसान आहे.परिवर्तनवादी चळवळीला एक एक माणूस जोडतांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात.एक एक माणूस विचारांनी तयार करायला अनेक वर्षे लागतात.अशी माणसे चळवळीचे वैभव असतात.आणि चळवळीचे वैभव असलेली,प्राण असलेली माणसे जेव्हा एकाएकी निघून जातात,तेव्हा चळवळीला बसणारा धक्का हा भूकंपासारखा असतो.सचीनभाऊंचे मराठा सेवा संघाच्या चळवळीतील स्थान,महत्व आणि लोकप्रियता शब्दातीत होती.त्यांच्या जाण्याने सेवा संघाच्या चळवळीला वैचारीक अधिष्ठान प्राप्त करुन देणारा एक मौल्यवान,त्यागी व समर्पित मावळा आम्ही गमावला आहे.त्यांच्या अचानक जाण्याचे दुःख शब्दातून वर्णन करणे कठीण आहे.त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतांना एवढेच म्हणू शकतो *मराठा सेवा संघाच्या चळवळीचा विचारस्तंभ कोसळला*

सचीनभाऊ,आम्हाला खूप लवकर सोडून गेले राजेहो ! 


                  प्रेमकुमार बोके 

                  अंंजनगाव सुर्जी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या