lost humanity | हरवलेली माणसं - एक प्रेरणादायी कथा – शैलजा दांडेकर

 हरवलेली माणसं – शैलजा दांडेकर

एक म्हातारा मीठवाला यायचा. त्याच ‘मीऽऽठ’ हे शब्द इतके हळू असायचे की कोणालाच ते ऐकू जायचे नाहीत. पण त्याची येण्याची वेळ ठरलेली होती. सकाळी अकराची त्याची वेळ कधी चुकली नाही. त्यामुळे त्या वेळात लोक त्याला बघायचे आणि हाक मारायचे. त्याच्या मोठ्या टोपलीत पुठ्ठ्याने दोन भाग केलेले असत. एका भागात खडे मीठ आणि दुसऱ्यात बारीक मीठ. त्याच्याकडे मीठ मोजून द्यायचं मापच नव्हतं. आपण जी बरणी समोर ठेवू ती गच्च भरून तो मीठ द्यायचा आणि बरणीचा आकार बघून पैसे सांगायचा. गिऱ्हाईकांनाही त्यात काही गैर वाटायचं नाही. तो सांगेल ते पैसे लोक देत असत. तोही अवास्तव पैसे सांगत नसे.


एखाद्याने जर सांगितलं की मला अर्धीच बरणी मीठ हवं आहे तरी तो बरणी गच्च भरूनच मीठ द्यायचा. “अरे, अर्धी बरणी सांगितली होती,” असं म्हटलं तर म्हणायचा, “मला कुणाची बरणी रिकामी ठेवलेली आवडत नाही. मग आपल्याला आयुष्यात अर्धंच सुख मिळतं. तुम्ही पैसे अर्ध्या बरणीचेच द्या.”


तो खरंच ह्या भावनेने बरणी भरत होता का त्याला माहित होतं की बरणीभर मीठ घेतल्यावर कुणीच अर्ध्या बरणीचे पैसे देत नसत. पुरे पैसेच देत. त्यामुळे त्याच्या वृत्तीचा अंदाज लागत नसे. पण मिठासारखी जेवणातली सर्वात महत्त्वाची जेवणाला चव देणारी गोष्ट तो आम्हाला घरबसल्या मोठ्या आपुलकीने पुरवत होता हे नक्की.


* * * *


हातगाडीवर केळ्यांचे खूप घड रचून एक केळीवाला यायचा. हिरवी आणि वेलची अशी दोन्ही केळी असायची. अजिबात ओरडायचा नाही. कॉलनीत आला की एका इमारतीच्या सावलीत गाडी उभी करायचा आणि दोन्ही हातात मावतील तेवढी पाच-सहा डझन केळी घेऊन प्रत्येक इमारतीच्या पाचही मजल्यांवर फिरायचा. मजल्यावर गेल्यावर ‘केऽऽळीवाला’ अशी हाक द्यायचा. दाराशी केळी आल्यामुळे खूप जण केळी घ्यायचे. खूप खप व्हायचा. तो असा फिरत असताना गाडीची राखण करायला कुणीही नसायचं. ती बेवारशीच उभी असायची. पण केळीवाल्याला त्याची काळजी नसायची.


मी एकदा त्याला म्हटलं, “गाडी अशी इथे टाकून जातोस. दोन-चार डझन केळी जर कुणी चोरली तर तुला कळणारही नाही.”


तो म्हणाला, “नाही ताई. ह्या कॉलनीत कुणी केळी चोरणार नाही ह्याचा मला विश्वास आहे. फुकट कोणी केळी उचलणार नाही. आम्ही पण माणसं ओळखतो. आणि ताई, कुणी उचललीच तर तो वरचा बघतो आहे. तो चोरणाऱ्याला ती पचून देणार नाही.” देवावरची श्रद्धा आणि माणसांच्या चांगुलपणावर विश्वास, ह्यावर त्या वेळी व्यवसाय चालत होते. विकणारा आणि विकत घेणारा ह्या दोघांची मनं स्वच्छ होती बहुतेक.


* * * *


फुलांची मोठ्ठी टोपली डोक्यावर घेऊन फुलवाला यायचा. मोगरा, जाई, सायली अशी हाराला उपयोगी पडणारी फुलं तो प्लॅस्टिकच्या पिशवीत वेगवेगळी बांधून आणायचा. खूप लोक हारासाठी ती सुटी फुलं घ्यायचे. बाकी सर्व टोपली लांब देठांच्या, विविध रंगांच्या, विविध जातींच्या, विविध आकारांच्या फुलांनी भरलेली असायची. त्याला फुलांचा बुके बनवता यायचा नाही पण आपल्याला हवी ती आणि परवडतील ती फुलं त्याला निवडून दिली की तो टोपलीच्या तळाशी ठेवलेली पानं बाहेर काढायचा आणि त्या निवडलेल्या फुलांची सुदर रंगसंगती साधून ती पानं लावून, दोऱ्याने बांधून सुबक गुच्छ तयार करायचा. फुलदाणीत तो गुच्छ फार छान दिसायचा. घरी आलेला प्रत्येक जण त्या गुच्छाचं कौतुक करायचा.


मी त्याला म्हटलं, “असं उन्हातान्हात दारोदार फिरण्यापेक्षा तू दुकान का टाकत नाहीस?”


तो म्हणाला, “ताई, दुकानाची फार कटकट असते. त्याचं भाडं मला परवडत नाही. म्युन्सिपाल्टीचे वेगवेगळे नियम पाळावे लागतात. हप्तेही वसूल केले जातात. ते झंझट मागे लागण्यापेक्षा मला हेच बरं वाटतं. दाराशी येत असल्यामुळे गिऱ्हाईकं खूप मिळतात. दगदग होते पण धंदा बरा होतो. खूप ओळखीही होतात. माणसं जोडली जातात. मध्यंतरी माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं तेव्हा कॉलनीतीलच लोकांनी मला पैशांची मदत केली. मी पैसे बुडवणार नाही हा त्यांना विश्वास होता. दुकानावर गिऱ्हाईकांशी इतकी जवळीक होत नाही.”


प्रत्येकाचं धंद्याचं गणित वेगळं असलं तरी एकमेकांवरचा विश्वास हेच त्यामागचं खरं सूत्र होतं.


* * * *


आंब्याच्या दिवसांत पाट्या घेऊन चार-पाच आंबेवाले यायचे. पण रघु पाट्या घेऊन येईल त्या दिवशी ते धंदा न करता सरळ बाहेर पडायचे. ह्याचं कारण म्हणजे रघु इतरांपेक्षा स्वस्त आंबे द्यायचा. त्यामुळे तो येईल त्या दिवशी इतरांचा धंदा होत नसे. रघु पोरसवदा आणि अगदी काटकुळा होता. तो येईल तेव्हा पाच पाट्या घेऊन यायचा. झाडाच्या सावलीत पण वॉचमनच्या जवळपास पाट्या ठेवायचा आणि एक पाटी घेऊन इमारतीत शिरायचा. बहुतेक वेळा त्याला त्यापूर्वीच एखाद्या ब्लॉकमधून हाक यायची. तो तिथे हमखास पाटी विकूनच यायचा.


त्याचे आंबे बाजारभावापेक्षा स्वस्त असायचे. तरी त्याच्याशी खूप घासाघीस करावी लागायची. तो पाटीचे तीनशे रुपये म्हणाला की माहितगार गिऱ्हाईक दीडशे म्हणायचा. मग तो खूप वेळ आपले आंबे कसे चांगले आहेत आणि भावही कसा रास्त आहे त्याचं वर्णन करायचा. शेवटी दोनशेला सौदा ठरायचा. तो भाव अर्थातच बाहेरपेक्षा स्वस्तच असायचा. आंबेही चांगले असायचे. दोन-तीन तासांत त्याच्या पाचही पेट्या संपायच्या, मग आठवडाभर तो दिसायचा नाही.


“बाजारभावापेक्षा स्वस्त आंबे तू कसे विकतोस? तुझं नुकसान होत नाही का?” शेजारणीने एकदा त्याला विचारलं.


तो म्हणाला, “ताई, कोकणात आमच्या आंब्याच्या बागा आहेत. आम्ही आंबा विकत घेऊन विकत नाही. मोठा धंदा आहे आमचा. क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुकान आहे. मी हाच धंदा पुढे करणार आहे. पण वडील म्हणतात एकदम गल्ल्यावर नाही बसायचं. धंद्याची गणितं स्वतः शिकायची. गिऱ्हाईकांना कसं पटवायचं, माणूस कसा ओळखायचा, मेहनत कशी करायची हे शिकत मग धंद्यात यायचं. वडील मला पाच पेट्या देतात. घरोघरी जाऊन विकायला सांगतात आणि येणारे पैसे तूच घे सांगतात. मला घरचा खर्च नसल्याने तेवढे पैसे मला पुरतात पण धंद्याची गणितंही कळतात. दोन वर्षांनी वडील मला स्वतंत्र गाळा घेऊन देणार आहेत. मग मला माझा वेगळा धंदा सुरु करता येईल.”


खरंच धंद्याची गणितंच वेगळी असतात. ‘वेष बावळा तरी अंतरी नाना कळा’ असा तो आंबेवाला होता.


* * * *


जस्ताची भली मोठी पेटी घेऊन खारी बिस्कीटवाला यायचा. त्याच्या ह्या मोठ्या पेटीत अनेक चौकोनी भाग होते. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांनी भरलेले असत. ही बिस्किटं स्वस्त आणि वजनाला हलकी असल्याने भरपूर यायची. त्यामुळे बिस्कीटवाला आला की मुलं एकदम खूश असत. तो माणूस अगदी म्हातारा आणि अशक्त होता पण जिद्दीने कॉलनीभर फिरून पेटी रिकामी करूनच परत जायचा.


“दादा, एवढी पेटी घेऊन दारोदार फिरण्यापेक्षा एक बेकरी का उघडत नाही? थोडं कर्ज काढायचं आणि बेकरी सुरु झाल्यावर हळूहळू फेडायचं,” मी सहज एकदा म्हटलं.


“कर्ज?” तो एकदम उसळून म्हणाला. “ताई जमिनीच्या तुकड्यासाठी माझ्या बापाने कर्ज काढलं आणि अचानक तो दगावला. कर्ज माझ्या डोक्यावर आलं. उमेदीची सारी वर्षं कर्ज आणि संसार ह्या दोन्हींच्या ओढाताणीत संपली. कर्ज फिटल्यावर कळलं तो सारा लबाडीचा मामला होता. ती जमीनही हातात आली नाही. आम्ही सारेच अशिक्षित. म्हणून ठरवलं, मुलांना शिकवायचं. जाताना त्यांच्यासाठी पैसा नाही ठेवून जाणार पण कर्जही नाही ठेवून जाणार. बेकरी टाकली तर मुलांना हाच व्यवसाय पुढे करावा लागेल. ते बंधनही मी ठेवणार नाही. त्यांना हवं ते त्यांनी त्यांच्या मनाने स्वतंत्रपणे करावं. मनासारखं आयुष्य जगावं. माझ्यासारखं आधीची ओझी उचलत जगायला नको.”


मी थक्क झाले. आयुष्यात एवढं सोसलेल्या माणसाशी आपण मात्र तो पाच रुपये म्हणाला तर चार रुपयांना दे म्हणून घासाघीस करत राहतो. अशिक्षित असूनही मुलांच्या भविष्याचा त्याने एवढा विचार केला होता. रोज पाहत असलेल्या त्या माणसात मला वेगळाच माणूस दिसू लागला.

🙏

(जून ३०, २०२१)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या