मुलींच्या कमतरतेने  युवकांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर, वाढती बेरोजगारी मूळ कारण !

हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, पोरगी म्हणते बाबा सरकारी नौकर पहा हो !



            माहूर -(जयकुमार अडकीने)   ग्रामीण भागात समाजाच्या सर्व स्तरातील युवकांच्या विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस 
गंभीर होत चालला असून कर्तबगार व नौकरदाराचेच विवाह योग्य वयात होत असल्याने बेरोजगार तरुणांचे विवाहाचे वय टळून त्यांना नाईलाजाने कायम ब्रम्हचारी राहावे लागत आहे. उच्च शिक्षण घेऊन सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या युवकांना आघाडी सरकारने हात दिला व मोदी सरकारने रोजगारावर लाथ मारल्याने हे बेरोजगार सहजपणे वयाची पस्तीशी पार करू लागले आहेत. तरीही लग्नाच्या बाजारात त्यांचे कुणीही दात पाहायला तयार नाहीत. काहीही असो वधूपित्यांना अच्छे दिन आले असून शेतीवाडी वाले खाऊन पिऊन सुखी असलेले विवाहेच्छूक तरूण हुंड्याचा फंदात न पडता केवळ  मुलगी दिली तर चालेल असे म्हणतांना दिसत असून गत दहा वर्षापूर्वी केवळ हुंडा देण्याघेण्याच्या कारणामुळे बारगळल्या जाणाऱ्या सोयरिकीच्या बैठका बारगळण्याचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी  उपवर मुली मात्र वडिलांकडे  सरकारी नोकरदारच पहा असा हट्ट धरत असल्याचे दिसत असल्याने सामाजिक चित्रच बदलले आहे. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवकांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.  
         मागील काही वर्षापासून परिस्थिती बदलली असून कोणतेही सरकार बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यास गंभीर नसल्याने बेरोजगारांची संख्या माहूर तालुक्यात हजारोच्या वर गेलेली आहे. बापाच्या नैतिक पापामुळे जमिनीचे तुकडे दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यातच नौकरी नसल्याने विवाहायोग्य वय होऊनही शेतकरी व शेतमजुरांच्या घराकडे कंगाल वधूपिताही फिरकत नसल्याने भावी काळात वय वाढलेल्या वरांच्या आत्महत्येची शृंखला सुरु झाल्यास नवल वाटावयाचे कारण नाही. लगीन होत नसल्याने तरुणाई व्यसनांच्या आहारी जाऊ लागली असून मुलींच्या शिक्षणाबाबत मात्र पालकामध्ये जागरूकता आली असून त्या मोठमोठ्या हुद्यावर जाऊन हुद्देवाल्यांनाच प्राधान्य देत असल्याने हाच मुद्दा शेती व व्यापार करणाऱ्या तरुणांच्या मुळावर येत असून शासनाने समाजजागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

              दहा पंधरा वर्षापूर्वी “मुलगी हे परक्याचे धन” आणि चूल आणि मुल संभाळण्यासाठी अशी या लेकीबाळीबद्दल सामाजिक धारणा होती त्यामुळेच तिच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पहिले जात नव्हते परंतु काळ बदलला आणि मुलांच्या तुलनेत मुली शिक्षणात अग्रेसर होऊ लागल्या आहेत. आपल्यापेक्षा कमी शिकलेला नवरा नकोअसे हक्काने आईला म्हणू लागल्याने एवढे परिवर्तन समाजात घडू लागले आहे. त्यामुळे शिक्षकाची पत्नी शिक्षिका, डॉक्टरची पत्नी डॉक्टर, वकिलाची पत्नी वकील, पोलीसाची  पत्नी पोलीस, परिचारकची पत्नी परिचारिका असे चित्र आज अनेक ठिकाणी बघावयास मिळत असून शेतकरी मात्र शेतकऱ्यांच्या पोराला पोरगी देण्यास कचरत असून पुण्यावालाच जावाई हवा या मानसिकतेत असल्याने शेतकरी, शेतमजूर, व बेरोजगार तरुणाइची पार गोची झाली आहे. व्यापारीवर्ग पण आपली पोरगी नौकरी वाल्यालाच घरदार विकून देत आल्याने त्यांची व्यापारी मुले पण नाईलाजाने बजरंगी भाईजान होत आहेत.
         पंचवीस वर्षापूर्वी एवढा हुंडा अमुक तोळे सोने, मोटरसायकल घेतल्याशिवाय विवाह जमणार नाही अशी अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या वरपित्याला आज फुकटात कुणी पोरगी देता का असे म्हणत भावी सून शोधण्याची पाळी आली आहे. पूर्वीच्या काळात प्रत्येक समाजाच्या वर-वधू परिचय मेळाव्यात दोन अडीचशे मुली पित्यासह जमायच्या तर पाच पंचवीस वरपिता वराला मंडपात न आणता माघारी त्याच्या बढाया मारत असत. परंतु नियतीने आज त्यांच्यावर सूड उगवला असून आता मेळाव्याला वर दोन अडीचशे आणि वधू पाच पंचवीस अशी विपरीत परिस्थिती आल्याने वरपित्यावर “ए क्या हुवा, कैसे हुवा, छोडो ये ना पुछो” हे गाणे गात डोक्यावर हात ठेवण्याची दुर्दैवी वेळ आल्याने गर्वाचे घर खाली झाले आहे. विविध क्षुल्लक कारणावरून पूर्वी डिंगरलेले वरपिते सोयरिक तोडायचे आता मात्र कुणाची सोयरिक मोडली असल्यास ती मुलगी सुद्धा स्वीकारण्यास राजीखुशीने तयार होत आहेत. सौंदर्याचा तर प्रश्नच उरला नसून मिळेल ते पावन करा ही प्रवृत्ती वरपित्यात फोफावत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री मोदिजींचे अच्छे दिन येवोत किंवा न येवोत मात्र लगीनघाईत  वधूपित्यांना  मात्र अच्छे दिन आलेत हे मात्र खरे.  काही का असेना समाजात एक अनुकूल परिवर्तन होत असल्याचे दिसत आहे. हेही नसे थोडके.  प्रत्येक बाबीवर अक्षरशः अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजकीय नेत्यांना आगामी निवडणुकीत विवाहेच्छूकांना तुमचे लग्न जुळवून देतो व संसार उभा करून देण्याच्या आश्वासनाची पण कधीही पूर्ण न होणाऱ्या आश्वासनात पडल्यास नवल वाटावयाचे कारण नाही.
मोबा. ९४२३४१०७३२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या