खऱ्या अर्थाने लोकशाही येण्यासाठी सक्तीने मतदान होणे आवश्यक
जयकुमार अडकीने माहूर - मोबा.९६२३४१०७३२
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज रोजी ७२ वर्षे पूर्ण झाली असून २६ जानेवारी १९५० रोजी प्रजसत्ताक राष्ट्र घोषित झाले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व स्तरातील नागरिकांना कोणताही भेदाभेद न ठेवता देशाचे राज्यकर्ते निवडून देण्याचा मताधिकार दिला. मात्र ज्यांना हा हक्क मिळवून दिला ती जनताच मतदानाबाबत जागरूक नसल्याने लोकशाही अस्तित्वात आल्या नंतर ६९ वर्षात आज तागायत १०० % मतदान न होऊ शकल्याने देशात खऱ्या अर्थाने लोकशाही रुजू शकली नाही हे कटुसत्य नाकारता येत नाही. परिणामी आज देशात मतदानाच्या ३० ते ३५ टक्के मते मिळविलेली मंडळी सत्तेत जाऊन बसल्याने मोठा समूह सत्तेच्या विरोधात असल्याचे देशभर सत्तेच्या विरुद्ध उद्रेक होत लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करत विविध आंदोलने होतांना दिसतात. काही आंदोलने हिंसक वळण घेत असल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पण दिसून येते. परिणामी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होऊन राष्ट्राचेच नुकसान होते.
या बाबीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असून याच मंडळीने देशाची लोकशाही बळकट करण्याच्या उद्दात हेतूने मतदानाचे महत्व पटवून देत सर्व नागरिकांना मतदान करणे कसे आवश्यक आहे हे पटवून देत मतदानाचा टक्का शंभर टक्क्यावर नेल्यास लोकशाही व्यवस्था बळकट झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित,
भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. समानतेचे हे एक फार महत्त्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येकाला मिळाले आहे, त्याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान आल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.
शतप्रतिशत मतदान न झाल्याने देशाचे मोठे नुकसान होत असून देशातील नागरिक विविध पक्ष व पंथात व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे मिळालेल्या विविध विचारश्रेणीत विभागला गेल्याने याच बाबीचा फायदा घेत काही चाणाक्ष मंडळी केवळ ३५ % मतदार हेच आपले लक्ष्य ठेऊन इतर ६५ टक्क्यात फोडा आणि राज्य करा या इंग्रजनीतीचा अवलंब करत आपली बाजू मजबूत बनवत सत्ता प्राप्त करून ६५ टक्क्यावर आपला रुबाब दाखवत लोकशाहीची बालुशाही करून खाण्यात व्यस्त आहेत. परिणामी काही अतिमहत्वकांक्षी नेते हिटलरशाहीचा पण राजरोसपणे अवलंब करतांना दिसत असून संखेने जास्त असलली सत्ताधारी विरोधी जनता मात्र त्यांची मुदत संपेपर्यंत पाच वर्ष तरी त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही.
तेव्हा खरे प्रजसत्ताक आणावयाचे असेल तर देशाच्या सर्व नागरिकांनी मतदानात भाग घेणे आवश्यक असून नागरिकांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करून आगामी लोकसभा व विधानसभा आणि सर्वच निवडणुकीत आवर्जून मतदान करून मतदानाचा टक्का शंभरावर नेणे आवश्यक आहे. आणि ज्यावेळी असे घडेल तो दिवस या देशात खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन ठरू शकेल.
आपण प्रत्येक जण सरकारकडून जशा काही अपेक्षा करत असतो, त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपणही मतदान करणे हे कर्तव्य ठरते. लोकशाहीने दिलेला हा अधिकार बजावणे म्हणूनच अतिशय महत्त्वाचे आहे. आपण एकटय़ाने मत न दिल्याने असा काय मोठा फरक पडणार आहे, असा विचार करणारेही या देशात बरेच जण असतात. पण असा विचार आत्मघातकी असतो. आपल्या एका मतानेही फरक पडू शकतो, हे लक्षात घेतले, तर मतदानाचे खरे मूल्य लक्षात येऊ शकेल. आपल्याला जो पक्ष किंवा उमेदवार महत्त्वाचा वाटतो, त्या पक्षाला मत देणे म्हणजे आपण ज्या विचारांवर विश्वास ठेवतो, त्याला आधार देण्यासारखे असते. मत दिल्याशिवाय या देशात परिवर्तन अशक्य आहे, याची जाणीव ठेवली, तर हे सरकार नको होते, असे घडले त्याला हेच सरकार कारणीभूत आहे अशा चर्चाना पूर्णविराम मिळेल. सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्याची मतदान ही एक संधी असते. कोणत्या प्रकारचे सरकार आपल्याला हवे आहे, हे सांगण्याचे ते एक निमित्त असते. म्हणून मतदानाच्या दिवशी सहलीला जाणे किंवा मतदानालाच न जाणे अतिशय चुकीचे आहे. सशक्त लोकशाही हवी असेल, तर मतदानाशिवाय पर्याय नाही. नागरिक सजग असल्याचे ते एक द्योतक असते. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. त्याचे मूल्य करून कुणी आपल्याला विकत घेऊ पाहत असेल, तर त्याच्या प्रलोभनांना बळी पडणे म्हणजे या अधिकाराचा घोर अपमान आहे, आश्वासने आणि प्रलोभनांपासून दूर राहून लोकशाही निकोप करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाने सहभागी होणे त्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
0 टिप्पण्या