समाजसुधारक युगपुरुष विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 भारताचे असामान्य व्यक्तीमत्व विज्ञीतज्ञ, अर्थतज्ञ, राजनैतिक तज्ञ, समाजसुधारक, तत्त्वज्ञ, घटनाकार  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोडक्यात परिचय या असामान्य व्यक्तित्वाचा जन्म मध्यप्रदेशातील महू या छावणीत दिनांक 14 एप्रिल 891 रोजी झाला. त्यांचे जन्म नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजीबाबा संपकाळ सुभेदार होते. त्यांचे मूळ गाव अंबवडे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात होते. त्यांच्या मातेचे नाव भिमाबाई होते. त्यांचा भीमरावांच्या बालपणीच मृत्यू झाला होता.



रामजी सेवानिवृत्तीनंतर कोकणात गावी आले. भीमरावला शाळेत घालायचे होते. त्यांचे मित्र गुरुवर्य कृष्णराव अर्जुनराव केळुसकर (कदम) यांची भेट झाली कोकणातील प्रचंड जातवाद  याचा विचार करून केळुसकर यांनी "संपकाळ "आडनाव बदलून "अंबावडेकर" करावयास लावले. जे पुढे अपभ्रंशाने "आंबेडकर" झाले. केळुसकर हे उत्तम लेखक वक्ता होते .त्याकाळचे थोर समाज सुधारक होते. त्यांनी अत्यंत उत्तम बुद्धचरित्र लिहिलेले होते. ते मराठीतील पहिलेच बुद्ध चरित्र होते.


प्राथमिक शिक्षण गावाकडे आटोपल्यावर केळुसकर गुरुजींच्या सल्ल्याने रामजींनी भीमराव याला साताऱ्याच्या आजच्या प्रतापसिंग विद्यालयात ठेवले तेथे ते मॅट्रिक झाले. केळुसकर गुरुजींनी अभिनंदन करून त्यांना स्वलिखित बुद्ध चरित्र ग्रंथ भेट दिला. नंतर स्वतः भीमरावला सोबत घेऊन उच्च व परदेशात शिक्षणासाठी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे गेले. बाबासाहेब उच्चशिक्षण घेऊन परदेशातून परत आले.बडोदा संस्थानात गेले पण जात वादाने परतले. त्यातूनच ते घडले त्याकाळी बडोदा संस्थानाच्या नियमात भिमरावचे उच्चशिक्षण व परदेश खर्च बसत नव्हता माननीय सयाजीराव महाराजांनी भिमराव हे आमच्याच कुटुंबातील मानसपुत्र आहेत असा शेरा  दिला व डॉक्टर आंबेडकरांसाठी बर्‍याच वेळा विशेष शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य दिले. बडोदा येथील बुद्ध पार्क मधील बुद्धा समोर बसून बाबासाहेबांनी अनेकदा केळूसकर गुरुजी लिखीत बुद्धचरित्राचे पारायण केले होते. त्याचा प्रभाव होऊन बाबासाहेब बुद्धाकडे वळले असावेत. दुर्दैवाने आज बडोदा शहरात व इतर ठिकाणी हा इतिहास न सांगता बडोद्यात बाबासाहेब याच दगडावर बसून रडल्याचे सांगणारेच जास्त आहेत.
त्यावेळी महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांचे सत्यशोधक,अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, अस्पृश्यता निवारण, ब्राह्मण-ब्राह्मणेतर लोकप्रबोधन, शिक्षणाचे सार्वत्रीकरण, मागासवर्गीय समाजाचा  विकास अशा स्वरूपाची कामे चालू होती. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती घेऊन त्यांची भेट घेतली 1920 च्या माणगाव परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आता दलित अस्पृश्य गरीब जनतेचे पुढारी आहेत असा सत्कार केला. बाबासाहेबांकडे नेतृत्व दिले.
बाबासाहेबांना अनुभवातून, अभ्यासातून, फिरण्यातून, संवादातून समाजातील विदारक चित्र दिसत होते. त्यांच्या समोर अज्ञान ,गरिबी ,जात वाद ,धर्मांधता हे प्रमुख शत्रू व त्यांनी घेरलेला बहुसंख्य समाज होता. मनुष्यबळ, अर्थबळ याची कमतरता होती. पत्नी रमाबाई यांची ओढाताण दिसत होती. पण निर्धार स्पष्ट होता. त्यातच रमाबाईंचा अकाली मृत्यू झाला.
प्रबोधनासाठी वर्तमानपत्र सुरू केले. "मुकनायक"सोबतच फिरून लोकांना हक्क अधिकाराची जाणीव देऊ लागले. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, संत कबीर ,महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रेरणास्थानी ठेवून बाबासाहेबांनी समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवात केली. रायगड किल्ल्यावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले व त्याच कर्मभूमीत महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिर अंबा भवानी मंदिर असे प्रवेश व हक्काचे सत्याग्रह झाले.
बाबासाहेब म्हणाले,"महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन तुम्ही अमर होणार नाहीत किंवा मरणारही नाहीत. तसेच नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाने तुम्ही फार मोठे होणार नाहीत मी दोन्ही सत्याग्रह केले ते तुम्हाला या देशामध्ये सामाजिक समता मिळावी याच साठी.
                      इंग्रजांनी व काँग्रेससारख्या संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य केले होते. सर्वच बहुजन समाजाचे सर्वांगीण कल्याण व्हावे हीच त्यांची भावना होती. परंतु स्पृश्य-अस्पृश्य वादाने ते शक्य झाले नाही. परिणामी आपले मानवतावादी हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक पातळीवर काम करण्यास सुरुवात केली त्यांची नेता म्हणून ओळख निर्माण झाली.
त्यातूनच लंडन येथे गोलमेज परिषदेत प्रतिनिधित्व ,काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करून स्वतंत्र मतदार संघ, आरक्षण, गांधी आंबेडकर पुणे (येरवडा )करार, विद्यार्थी परदेश शिक्षण, राज्यघटना समिती, विविध वाटाघाटी शक्य झाल्या. सामाजिक सुधारणा व सामाजिक समता प्रथम प्रस्थापित व्हावी व नंतर राजकीय विचार व्हावा ही मागणी त्यांनी रेटली. तर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आणि भारतातील सनातनी कर्मठ धार्मिक ,सांस्कृतिक व आर्थिक दृष्ट्या गुलामीत भारतीय समाज कायदेशीररीत्या कैद झाला. इंग्लंडच्या संसदेने "ट्रांसफर आॅफ पाॅवर"सत्ता हस्तांतरण केले.
 ही गुलामी घालविण्यासाठी दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश संघराज्य घोषित होऊन गणतंत्र पद्धतीने लोकशाही शासन लागू झाले. त्यावर भाष्य करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते," स्वातंत्र्य, न्याय ,समता, बंधुत्व या पायावर आपण राज्यघटना उभी केली आहे. भारत राष्ट्राला "अत्याधुनिक मानवी जीवनमूल्ये" देणारी ही घटना आहे. यातून आपला समाज एकसंघ, संवादी, सांस्कृतिक व धार्मिक पातळीवर उन्नत व्हावा अशी अपेक्षा आहे . आपल्या एका काखेत विषमता, द्वेष ,अमानवता ,अस्पृश्यता श्रेष्ठ सांगणारे धर्मग्रंथ आहेत तर एका काखेत अतिमूल्याधिष्ठित नवविचारांचे विश्वव्यापी मानव कल्याण विचारतत्वे आहेत आम्हाला यापैकी एकाचा स्वीकार करावा लागेल.
ते स्वतः मंत्री असून देखील जातीयवादाचा त्यांना भयंकर त्रास सहन करावा लागला आणि म्हणून त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून समतावादी बौद्धधम्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. प्रज्ञा ,शील, करुणा ,समतावाद हे बौद्ध धर्माचे तत्व त्यांनी स्वीकारले आणि मानव कल्याणाच्या विचार केला आणि शेवटपर्यंत याच तत्त्वानुसार  त्यांनी आचरण केले.सर्व मानवजातीचा उध्दार हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून  जातीयवादाला मूठमाती देत व सर्व जातीधर्माच्या कल्याणाचा विचार ज्यात केला गेला अशी सर्वसमावेशक आदर्श अशी भारतीय राज्यघटना त्यांनी आपल्याला दिली.असे थोर समतावादी मानव भारतात जन्माला आले म्हणूनच आज जगाच्या पाठीवर भारत सर्वात मोठा आदर्श लोकशाही प्रधान राष्ट्र ठरतो.

आज खरी गरज आहे ती सर्व बहुजन समाजाला आत्मकल्याणाच्या दृष्टीने शिव,शाहू ,फुले,आंबेडकर यांच्या विचारसरणीची व त्याच्या तत्वांनी आचरण करण्याची.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या