आमचा धर्म वारीचा आहे, कुंभमेळ्याचा नाही -- सचिन परब यांचा हा लेख वाचायला हवा.



१९९०ला `आशिकी` आला. त्याची गाणी ऐकत किमान दोन तरी पिढ्या तरुण झाल्या. प्रेम करायला शिकल्या. जगायलाच शिकल्या. `अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी पी लेंगे हम`, यात या पिढ्यांचा अॅटिट्युड होता. `बेताबी क्यां होती हैं, पूछो मेरे दिल से. तनहा तनहा लौटा हूं, मैं तो भरी महफिल से,` ही ब्रेकअप पचवल्याची खुमारी होती. `ओ दुश्मन जमाना मुझे ना भूलाना, मैं दुनिया मिटा दुंगा तेरी चाहत में,` ही या पिढ्यांची खुद्दारी होती. 


आशिकी बघून प्रत्येकाला वाटलं आपणही हीरो हीरोईन होऊ शकतो. प्रत्येकाला वाटलं आपण गाऊ शकतो. इतकी सोपी होती ती गाणी. कळायला सोपी. गायला सोपी. म्हणून रूजायला सोपी. काही पिढ्यांच्यात आतवर रूजली. भारतीय संगीताचा सर्वाधिक विकला गेलेला अल्बम बनली. त्या विक्रमावर नदीम श्रवण असं नाव कोरलेलं होतं. धार्मिक राजकारण, उन्माद आणि दंगलींनी भरलेलं नव्वदचं दशक गाजवणाऱ्या सगळ्यात हिट संगीतकार जोडीतला एक हिंदू, दुसरा मुसलमान हे कोणाच्या लक्षातही येत नव्हतं. पण ते त्यांच्या आणि सगळ्यांच्या नकळत खूप काही जोडत होते, घडवत होते. 


पुढे नदीमचं नाव दाऊदशी जोडलं गेलं आणि सगळं खळ्ळकन फुटलं. खुनाच्या आरोपात नदीम दुबईला गेला. आपल्यासाठी असून नसल्यासारखा झाला. आता श्रवणही नाही. सध्या कुमार सानू क्रेड या मोबाईल अप्लिकेशनच्या जाहिरातीत विमा पॉलिस्या विकताना दिसतोय. तेव्हाच श्रवण कोरोनाने गेल्याची बातमी आलीय. क्रेडचा टार्गेट असलेल्या एज ग्रुपच्या मनाचा एक हळवा कोपरा कायमचा रिता झालाय. 


सलग दुसऱ्या दिवशी श्रवण हेडलाईनीत राहिला. कारण तो हरिद्वारच्या कुंभमेळ्यातून कोरोना घेऊन आला होता. मुंबईत सर्वोत्तम उपचार पायाशी लोळण घेत असतानाही त्याचा मृत्यू झाला. १२ ते १४ एप्रिल या तीन दिवसांत साधारण दहा लाख जणांनी गंगेत आंघोळ केली. पीटीआयच्या बातमीनुसार कुंभमेळ्यातल्या एकूण हजेरीचा आकडा सत्तर लाख आहे. यापैकी अनेकजण श्रवणसारखेच आपल्यासोबत कोरोना घेऊन गेले. श्रवण तर सर्वोत्तम वैद्यकीय सोयी उपलब्ध असलेल्या मुंबईत आले होते. बाकीचे कुठल्या बारक्या बारक्या गावाशहरांमधे मरण भोगत आणि पसरवत असतील, याची कल्पना करवत नाही. 


मध्य प्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यात ग्यारसपूर नावाचं तालुक्याचं शहर आहे. सरकारी आकडेवारीनुसार या शहरातून ८३ जण कुंभमेळ्याला गेले होते. २५ एप्रिलला स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी शोधाशोध केली, तेव्हा २२ जण त्यांना सापडलेच नाहीत. ६१ जणांची टेस्ट झाली. त्यापैकी ६० जण कोरोना पॉझिटिव निघाले. इतकं हे भयंकर आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापासून देशात अचानक कोरोना झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली त्याचं एक महत्त्वाचं कारण कुंभमेळा असल्याचं स्पष्ट होत आहे. देशभरात साडेतीन ते चार लाख जणांना रोज कोरोनाची लागण होतेय. 


डॉ. आशिष झा हे जवळपास पावणेतीनशे वर्षांचा इतिहास असणाऱ्या अमेरिकेतल्या ब्राऊन युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन आहेत. सार्वजिनक आरोग्य या विषयात जगात सर्वाधिक सन्मान असणाऱ्या आरोग्यतज्ञांमधले ते एक आहेत. त्यांनी प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय, `मास्कचा वापर न करता आणि सुरक्षित अंतर न पाळता मार्च आणि एप्रिल महिन्यात २० ते ३० लाख जणांनी शाही स्नान केलं. ते आजवरच्या साथरोगांच्या इतिहासात सर्वात मोठे सुपरस्प्रेडर ठरणार आहे.` 


हे काही अनपेक्षित नव्हतं. १७ एप्रिलला जुन्या आखाड्याचे महंत नारायण गिरी म्हणाले, 'मृत्यू तर अटळ आहे. आपण आपल्या परंपरा जपायला हव्यात.` त्याआधी ६ एप्रिललाच एएनआय या वृत्तसंस्थेने बातमी दिली होती की कुंभमेळा हा सुपरस्प्रेडर इवेंट ठरणार असल्याची चिंता केंद्रीय आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटतेय. त्यावर केंद्रीय आरोग्यखात्याने ट्विट करून खुलासा केला की ही फेक न्यूज आहे. पण ती बातमी खरी असल्याचं आज सिद्ध होतंय. आंतरराष्ट्रीय दैनिक 'द वॉशिंग्टन पोस्ट'मधे २८ एप्रिलला छापून आलेल्या लेखाचा मथळा लांबलचक आहे, `मोदीज पॅनडेमिक चॉइस : प्रोटेक्ट हिज इमेज ऑर प्रोटेक्ट इंडिया. ही चूज हिमसेल्फ.` त्यात लेखक सुमित गांगुली लिहतात, `मोदींनी तीन महिने चालणाऱ्या कुंभमेळ्याला परवानगी दिली. कारण त्यांना निवडणुकांसाठी धार्मिक हिंदूंची मतं दुखावायची नव्हती. यातून एक स्पष्ट संदेश आहे – पूर्वनियोजित धोरणांची लक्ष्यपूर्ती, राजकीय ड्रामेबाजी आणि निवडणुकांचे निकाल हे देशातल्या नागरिकांच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत.` 


हे सारं खुळ्या धर्मापायी चालत होतं. कोणतं तरी कर्मकांड, कोणता तरी शुभकाळ, कोणता तरी मोक्ष, कोणतं तरी पापाचं प्रायश्चित्त, या सगळ्यालाच धर्म मानून कुंभमेळ्याचा खेळ होत राहिला. आज त्या धर्मापायी हजारो माणसं रोज मरत आहेत. माणसांना मारणारा धर्म असूच शकत नाही. मग त्या धर्माला हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन असं कोणतंही नाव दिलेलं असो. 


हे घडत असतानाच आपल्या पंढरपुरात २३ एप्रिलला चैत्री वारी होती. ती रद्द झाला. आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे महाराष्ट्रातले महत्त्वाचे सोहळे. पण चैत्री आणि माघी वारीलाही पंढरपुरात लाखालाखांची गर्दी होते. गेल्या वर्षीच्या चैत्री वारीसह वर्षभरातल्या चारही वाऱ्या रद्द झाल्या. आषाढीचा पालखी सोहळा नावालाच झाला. पालख्या नाहीत, दिंड्या नाहीत, गर्दी नाही, काही नाही. खरंतर घरात मरण झालं, तरी वारकरी मढं झाकून वारीला जातो, इतकी त्याची निष्ठा असते. `वारी चुको नेदी हरी`, असं तो विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला. 


वारकऱ्याला उचकवण्याचे प्रकार झाले नाहीत असं नाही. देवळं उघडावीत, यासाठी आंदोलनं झाली. पंढरपुरातही मोर्चे काढले. वारकऱ्यांचा पत्कर घेऊन पालखी सोहळ्यासाठी धर्माच्या नावाने मोठमोठ्या घोषणा झाल्या. काही वारकऱ्यांच्या नेत्यांनीही त्याला पाठिंबा दिला. बंडातात्या कराडकरांसारख्या ज्येष्ठ फडकऱ्यांनी तुकाराम बीजेसाठी देहूत आंदोलन करण्याची घोषणा केली. असं सगळं झालं तरी  खऱ्या वारकऱ्यांनी वारीचा कुंभमेळा होऊ दिला नाही. कारण त्याला तुकोबारायांच्या विचारांची दीक्षा आहे. 


आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्या भटा जाली धनी ।।१।।

अंतरी पापाच्या कोडी । वरीवरी बोडी डोई दाढी ।।२।।

बोडिले ते निघाले । काय पालटले सांग वहिले ।।३।।

पाप गेल्याची काय खुण । नाही पालटले अवगुण ।।४।।

भक्ती भावे विन । तुका म्हणे अवघा सीण ।।५।।


त्र्यंबकेश्वर नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हणतात. त्याची तुकोबारायांनी या अभंगात चांगलीच हजामत केलीय. कुंभमेळ्यांमधे फक्त न्हावी आणि भटांची कमाई होते, पण पाप काही जाऊ शकत नाही, असं तुकोबांनी स्पष्ट स्पष्ट सांगितलंय. `तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी,` असं सांगत त्यांनी कुंभमेळ्याच्या डोळ्यात अंजन टाकलंय. तीर्थात कातडी धुवून काय होणार, मन शुद्ध करण्यासाठी काय केलंस, असा त्यांचा प्रश्न आहे. समुद्र मंथनात अमृताचे थेंब पडले तिथे कुंभमेळा होतो म्हणे. पण मुळात वारकरी परंपरेला अमृतात इंटरेस्टच नाहीय. 'तुका म्हणे तीर्थजळी, काऊळे चिमण्या न नहाती?' त्यांना मोक्ष मिळाला का, असं तुकोबा विचारतात. 


कोणता तरी ग्रह सूर्याच्या भ्रमणरेषेतून जातो किंवा सूर्य ग्रहाच्या भ्रमणरेषेतुन जातो, त्याच वेळी डुबकी मारण्याचा बिनडोकपणा लाखो लोक कुंभमेळ्यात करतात. तुकोबा त्यांना सांगतात, `तुका म्हणे हरीच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा।।` शाही स्नान करून मोक्षच मिळवायचा असेल, तर तो हवाय कुणाला? `तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी`, असं आमचं मागणं आहे. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन भक्ती करायचीय. वीस दिवस चालत पंढरपुराला जाऊन विठ्ठलाचं दर्शनही न घेणारी ही भक्तीच्या मिजासीने भारलेली माणसं आहेत. कारण त्यांचा सखा विठोबा वारीत त्यांच्यासोबत चालत असतो, गात असतो, नाचत असतो. खरा वारकरी संत सावता माळी यांचा आदर्श समोर ठेवून जगातलं सगळ्यात मोठं सुख लॉकडाऊनमधे `ऍट होम`ही मिळवू शकतो. 


भगवे कपडे घालून साधू होता येत नसतंच. `जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले,` तोच खरा साधू आणि तोच खरा देव. संन्यासाचं कौतुक आम्हाला नाहीच. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंतांना लक्षात आलं की संन्यासात अर्थ नाही. ते एक क्षणही तिथे थांबले नाहीत. संसारात परतले. संन्यासाचं कौतुक असणाऱ्यांनी त्यांचा छळ केला. पण त्या छळातून ज्ञानेश्वर माऊलींच्या करुणेचा जन्म झाला. नव्या विचारांचा जन्म झाला. वारकरी परंपरेची सुरवातच संन्यास नाकारण्यासाठी झालीय. संन्याशांची कुंभमेळ्यातली नाटकं नाकारण्यासाठी झालीय. तुकोबा हे जग सोडून गेले, तेव्हा त्यांच्या पत्नी जिजाई या गरोदर होत्या. इतकं रसरसून आयुष्य जगायला सांगणारी ही परंपरा आहे. तिच्यावर लाखो लोकांच्या मरणाची पर्वा नसलेल्या भणंगांच्या कुंभमेळ्याची सावलीही पडायला नको. 


कुंभमेळ्यात वारकरी संप्रदायाला आखाडा बनवून स्वतःला महंत आणि महामंडलेश्वराचा सिंहासनाभिषेक करून घेणारे धर्माचे दुकानदार वारकरी संप्रदायातही आहेत. चांगल्या वाईटाची साधी समजही त्यांनी गमावलीय. म्हणून त्यांना खऱ्या वारकऱ्यांनी कोरोनाच्या निमित्ताने तुकोबा नव्याने सांगायलाच हवेत. `सत्य आम्हां मनी, नव्हें गबाळाचे धनी। देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरें।।` हाच तुकोबांनी दाखवलेला खऱ्या धर्माचा रस्ता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या