Nikhil Wagle's special article about teacher MLA Kapil Patil
मित्रहो, कपिल पाटील यांच्या भाषणांच्या संग्रहाचं प्रकाशन झालं आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. अशा कार्यक्रमामध्ये कपिल पाटील यांना अहो-जावो म्हणणं आवश्यक आहे. पण माझ्यासाठी त्यांचे संबंध इतक्या वर्षांचे आहेत की, मी त्यांचा उल्लेख अरे-तुरे करणार आहे. आणि तो आपुलकीतून आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जसं सचिन तेंडुलकरला आपण अरे-तुरे करतो, लता मंगेशकरचा सुद्धा एकेरी उल्लेख करतो किंवा अमिताभ बच्चनचा सुद्धा. तसंच कपिल पाटील यांचा सुद्धा उल्लेख आपुलकीने एकेरी करणार आहे.
कपिल आमच्या दृष्टीने कायम कपिल आहे. आता अतुलने सांगितल्याप्रमाणे एव्हरग्रीन आहे. त्याची जाडी वाढली नाही. त्याचे केस बघा तसेच आहेत. ८० आणि ९० सालीसुद्धा असेच होते. हा माणूस असाच दिसत होता, असाच लालबुंद होता. ह्याच्यामध्ये काडीचाही काही फरक नाही. या ३० वर्षांत मी असाच पाहतोय. कपिल कॉलेजमध्ये होता, आम्ही 'दिनांक' नावाचं साप्ताहिक लॅमिंग्टन रोडच्या एका बिल्डिंगमध्ये पडक्या चाळीत चालवत होतो; तेव्हापासूनचा हा सगळा प्रवास आहे.
Nikhil Wagle's special article about teacher MLA Kapil Patil
मी जेव्हा माझं पहिलं वृत्तपत्र 'महानगर' सुरू केलं तेव्हा माझा पहिला चीफ रिपोर्टर, मुख्य वार्ताहर हा कपिल होता. त्या काळातील किस्से तुम्हांला माहिती नाहीत. महानगरच्या उभारणीत सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये कपिलचं महत्त्वाचं योगदान आहे. कपिल आज आमदार झालाय म्हणजे राजकारणी झालाय. त्याला तेच व्हायचं होतं. म्हणजे एवढी क्लिअॅरिटी होती. महानगरच्या सुरुवातीच्या काळात ते प्रचंड पॉप्युलर व्हायला लागलेलं होतं आणि कपिल पाटील मुख्य वार्ताहर होता. त्याआधी तो सकाळमध्ये होता आणि अत्यंत स्फोटक अशा बातम्या तो देत होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या संबंधी त्या होत्या. पहिल्यांदा विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदेंचं शरद पवारांविरुद्धचं बंड. १९९० साली ते झालं होतं. ही बातमी पहिल्यांदा कपिल पाटीलने दिली. छगन भुजबळ शिवसेना सोडायला निघाले तेव्हा ते कुठे गेले आणि अज्ञातवासात कुठे होते, हे महाराष्ट्रात फक्त कपिल पाटीलला माहीत होतं. हे मी सत्य सांगतोय. त्यामुळे अज्ञातवासातले त्यांचे फोटो फक्त महानगरमध्ये प्रसिद्ध होत होते. विलासराव देशमुख उद्या कोणतं पत्रक काढणार हे कपिल पाटीलच आदल्या दिवशी सांगू शकत होते. मला एक दिवस माधव गडकरींनी फोन केला. 'लोकसत्ता'चे संपादक होते माधव गडकरी. माधव गडकरी आणि गोविंद तळवळकर फार सिनिअर्स होते. त्यांच्या दृष्टीने त्या काळामध्ये आम्ही पोरंच होतो. ठीक आहे. त्यांनी मला फोन केला, 'तुझा वार्ताहर कपिल पाटील काय करतोय माहितेय का?' मी म्हटलं काय करतोय? 'तो मंत्रालयात वार्ताहर आहे. तो तिकडे कव्हर करायला गेलाय.' ते म्हणाले, 'नाही, नाही तो तिथे राजकारण करतोय.'
कपिल पाटील याच्यामध्ये हे सगळे गुण आहेत. माझं असं म्हणणं आहे, तो राजकारणात गेला, त्याला जायचंच होतं. मला अजून एक संवाद आठवतोय. कपिलच्या तो लक्षात आहे की नाही मला माहीत नाही. १९९१ किंवा १९९२ सालचा तो आहे. महानगर खूप जोरात होतं. वाढत होतं. आम्हांला एवढी अपेक्षा नव्हती एवढं यश मिळालं होतं. कपिल हा चीफ रिपोर्टर होता, माझ्यानंतरचा तिकडचा सिनिअर तोच होता. मी एक दिवस कपिलला जेवायला घेऊन गेलो आणि विचारलं, तुला पुढे काय करायचंय? ह्याचं कारण सेकंड लिडरशीप आपल्याकडे तयार असावी लागते. तर त्यांने मला त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं की, मला राजकारणात जायचंय. मला त्यावेळेला जरा आश्चर्य वाटलं होतं, धक्का बसला होता. ह्याचं कारण एवढी क्लिअॅरिटी फार कमी लोकांना असते. पत्रकारितेत जो माणूस चांगलं काम करत होता, चांगला बातमीदार होता, वार्ताहर होता. चांगलं एक स्वतःचं त्याचं नेतृत्व तिथे तयार होतं. अशा वेळेला तो सांगत होता, 'मला राजकारणात जायचंय.' १९९१-९२ सालची ही गोष्ट आहे. मला हे कळत नव्हतं कपिल कसा राजकारणात जाणार? तो कोणत्याही पार्टीत नव्हता. हे लक्षात घ्या. मी आज तुम्हांला सांगतो कपिल पाटील या माणसाकडे असं कसब आहे की कपिल पाटील हीच एक पार्टी आहे. आता तो फक्त आमदार झालेला आहे. कारण खरंच चळवळीतला कार्यकर्ता आमदार म्हणून यशस्वी होतो. ह्या सगळ्या लबाड व्यवस्थेमध्ये तो चांगलं काम कशा पद्धतीने करतो हे दिसतंय. हे कसब आहे, हे मला सुद्धा जमलं नाही. कोणालाच जमणार नाही. मला बॉम्ब फेकायला जमेल एक वेळ.
एका बाजूला सत्ताधाऱ्यांना व्यवस्थित वाकवणं. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांना गुंडाळणं आणि शिक्षकांची चांगली कामं करून घेणं हे कसब फार कमी लोकांत असतं. कोणत्याही पक्षात नसताना कपिल आमदार होईल असं आम्हांला वाटलं नव्हतं. पण तो एक दिवस अचानक २००६ साली आमदार झाला. मोठ्या मतांनी तो निवडून आला. शिक्षक आमदारांची महाराष्ट्रात परंपरा आहे. आधी शिक्षक आमदारांचे मतदारसंघ हे समाजवाद्यांकडे असायचे. ग. प्र. प्रधानांच्या काळात. सदानंद वर्दे यांच्या काळात वगैरे. नंतर ते हळूहळू भाजपने काबीज केले आणि भाजपचे लोक निवडून यायला लागले. पुरोगामी लोकांनी महाराष्ट्रात ही आशा सोडून दिली होती की शिक्षक आमदार कोणी पुरोगामी निवडून येईल. आणि एक दिवस अचानकपणे २००६ साली कपिल निवडून आला. ही आश्चर्याची गोष्ट होती. आम्ही ६ वर्षे कपिलचं काम पाहत होतो. पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला. एकदा निवडून आला असं नाही आता ही दुसरी टर्म आहे कपिल पाटील याची. ह्यातच त्याचं यश सामावलेलं आहे.
या दुसर्या टर्मच्या वेळेला कपिल पाटील यांना बदनाम करण्याचे त्यांच्या विरोधकांनी काय काय प्रयत्न केले मी स्वतः पाहिलेलं आहे. शिक्षकांना १ तारखेला पगार मिळायला लागला होता. ते कार्ड तुमच्या बँकेचं तयार झालं होतं. त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय वगैरे मलाच फोन करून भारतीय जनता पक्षाचे लोक सांगायचे. मी म्हटलं, हो का? मी कपिल पाटीलला खूप वर्ष ओळखतो, हे त्यांना माहिती होतं की नाही, हे माहीत नाही. पण मलाच फोन करून सांगायचे. माझी अशी एक भूमिका असते की निवडणुकीच्या तोंडावर कुणाच्याही बदनामीचा कार्यक्रम करायचा नाही. कोणतीही निवडणूक असो. बँकेची निवडणूक असो, पतसंस्थेची निवडणूक असो, साखर कारखान्याची निवडणूक असो, एकमेकांवर आरोप करणं आणि भ्रष्टाचार मोठा झालाय असं सांगणं हे दोन्ही गटांचं कामच असतं. दुसऱ्या चॅनेलने कार्यक्रम केले. मी हा कार्यक्रम करायलासुद्धा नकार दिला. कारण ज्या माणसाचं काही काम नाही असं तुम्हांला माहिती असतं, त्या माणसाने निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराचे आरोप करून रान उठवणं हे बरोबर नाही. तुम्हांला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ते तुम्ही नंतर करा. ते सिद्ध करा. मला ही खात्री होती, कपिल पाटील ह्या कामामध्ये भ्रष्टाचार करणार नाही. राजकारणामध्ये माणसाला तडजोडी कराव्या लागतात. पण मूळ जो पिंड असतो, मूळ जे तत्त्व असतं ते शिक्षक भारतीच्या सिम्बॉलमध्ये आहे. त्याच्यावर सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या प्रतिमा आहे. ही परंपरा जो मानतो त्या सगळ्या परंपरेचा जो माणूस आहे आणि पहिल्यापासून ती परंपरा त्याने जपलेली आहे. त्याची भाषणे पाहा. भाषेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल. चळवळीतून आलेले हे सगळे लोक आहेत. गेल्या एवढ्या सहा-आठ वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा चळवळीचा मुद्दा निर्माण झाला तेव्हा तेव्हा विधिमंडळात कपिल पाटील हाच चळवळीचा आवाज झालाय. हा अनुभव मला आहे. म्हणजे मला सर्व पक्षातले असे चांगले आमदार माहिती आहेत. किंबहुना मी ते बघून ठेवले आहेत. मी त्यांना फोन केला की हा प्रश्न आहे. हा नर्मदा खोऱ्यातल्या आदिवासींचा प्रश्न आहे. हा मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हा विदर्भातल्या कुठल्यातरी माणसाचा प्रश्न आहे. त्यांचे हे प्रश्न विधिमंडळात मांडले गेले पाहिजेत. असं ज्या आमदारांना फोन करून अगदी सांगावं आणि त्यांनी तो मांडावा असा एक खात्रीलायक आमचा माणूस कपिल पाटील. असे खूप कमी आमदार आहेत ज्यांना प्रश्न कळतात. मी जेव्हा विधानसभेतल्या आमदारांना 'मवाली' म्हटलं, तेव्हा कपिलने पण माझ्याविरुद्ध भाषण केलं होतं. पण माझा त्याच्यावर काहीही राग नाही. माझ्या अनेक मित्रांनी माझ्याविरुद्ध भाषणं केली होती. ज्या व्यासपीठावर बुद्धी आणि वाणीचाच उपयोग झाला पाहिजे, हातापायांचा होता कामा नये; त्या व्यासपीठावर दहा टक्केसुद्धा असे आमदार नाहीत, जे बुद्धी आणि वाणीचा उपयोग करतील. त्या दहा टक्के आमदारांपैकी अपवादात्मक आमदार म्हणजे कपिल पाटील. ज्यांची भाषणं ऐकावीत, त्यांचे मुद्दे ऐकावेत. दुसरा आमचा आमदार विवेक पंडित. आमचा जुना मित्र आहे. वेठबिगारांच्या-वेठबिगारीच्या विरोधात काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांची भाषणं ऐकावीत. शिवसेनेमधील काही आमदार असतील. मनसेमधील काही आमदार असतील. पक्षांच्या पलीकडे जाऊन चांगल्या आमदारांचा म्हणून एक स्वतंत्र पक्ष आहे, असं मी मानतो. प्रत्येक पक्षात चांगले लोक आहेत. प्रत्येक पक्षात माणुसकीची जाण असलेले लोक आहेत. समतेच्या मूल्यांना मानणारे लोक आहेत. अशी माणसं घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल.
सगळ्या जगाचं आज गुन्हेगारीकरण झालंय, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त राजकारणाचं नाही. मी जे महाराष्ट्रामधील राजकारण बघतोय, मीडियामधून जे येतंय ते फारच कमी आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं पैशाचं आणि गुन्हेगारीचं राजकारण चाललंय ते किळसवाणं आहे. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर याची मला खात्री झाली आहे की, या राज्यामध्ये कुणाचाही खून कधीही होऊ शकतो. सतीश शेट्टींचा खून झाला. दाभोळकरांचा खून झाला. त्यांना न्याय नाही मिळू शकत. आपण नष्ट होऊ ही अपेक्षा मनात ठेवूनच काम केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. असंच काम करणारी जी माणसं आहेत, त्यापैकी एक कपिल पाटील आहे. अनेकदा मी त्याच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. पत्रकार म्हणून ते माझं काम आहे. माझ्याशी संबंध ठेवणं हे किती भयंकर काम आहे हे कपिलला माहीत आहे. जनसंपर्काच्या बाबतीत मी अगदी ढ माणूस आहे. माझा कुणाशीही संपर्क नसतो. मी बोलत नाही, मी अढ्यताखोर आहे, मी उद्धट आहे, वगैरे असं बोललं जातं. पण अगदी आपुलकीने माझ्याशी संबंध ठेवणारे जे कोणी राजकारणी आहेत त्यामध्ये कपिल पाटीलचा क्रमांक वरचा आहे. चार वर्षांपूर्वी मला हार्ट अॅ टॅक आला. माझं ऑपरेशन झालं. तेव्हा हॉस्पिटलमध्ये जेवणाचा डबा घेऊन येणारा हा आमदार होता. हे वैयक्तिक संबंध असतात. खूप कमी राजकारणी असे संबंध जपतात. मी एक पत्रकार आहे. त्याची काही खात्री नाही. तो काहीपण कधीपण बोलू शकतो. कधीही टीका करू शकतो. त्याला पटवणं ही अवघड गोष्ट आहे. तरीसुद्धा त्याच्याशी संबंध ठेवणं, ते संबंध जोपासणं, आणि ते संबंध विचारांच्या आधारे असतात. तो जो आधार आहे, ते जे नातं आहे, त्याचं महत्त्व ज्याला कळतं, असा हा तुमचा आमदार आहे. मी तुम्हांला खरंच सांगतो, तुम्हांला खूप चांगला आमदार मिळालेला आहे. केवळ बुद्धिवादी आमदार मिळालेला नाहीये. ज्याला व्यवहारवाद उत्तम प्रकारे कळतो, असा हा आमदार आहे. त्यामुळे त्या आमदाराला तुम्ही दोनदा निवडून दिलंय. असा आमदार विधानपरिषदेत कायम असला पाहिजे. कपिल निवडून येण्यामध्ये सक्षम आहे. मला त्याच्याबद्दल शंभर टक्के खात्री आहे. कारण तो फक्त भाषणं करणारा आमदार नाही. अतुलने सांगितलं तसं त्याचं संघटन कौशल्य बघा. फेसबुक, ट्विटरचा चांगला वापर 'शिक्षक भारती' करते. मी सकाळी फेसबुकवर गेलो तर शिक्षक भारतीची जाहिरात होती. मी बघितलं. क्लिक केलं. कपिल पाटीलच्या आवाजातच निमंत्रण होतं. म्हणजे हे ज्याला भान आहे ना, की आधुनिक माध्यमे वापरली पाहिजेत. असा माणूस आजच्या जगामध्ये आवश्यकच आहे आणि तो कपिल पाटील आहे. म्हणून मी आपुलकीने आलोय. तो कोणत्या पक्षात असला, नसला. तो आमदार असला, नसला. तरीही काही लोकांना आमदार आहे, खासदार आहे यामुळे काही फरक पडत नाही.
कपिल आज अपक्ष आहे. पण उद्या तो आपल्या या सगळ्या राजकीय संघटन आणि संबंधांच्या कौशल्याच्या बळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. तसे पूर्णपणे गुण त्याच्यामध्ये आहेत. तो होईलच असे नाही. पण महाराष्ट्राचं राजकारण मॅनेज करायची आणि त्या राजकारणातून काही चांगल्या गोष्टी घडवण्याचे गुण त्याच्याकडे आहेत. मी अवास्तव स्तुती करत नाही. त्याच्याकडे कोणते गुण आहेत ते मी सांगतोय. कारण महाराष्ट्राच्या सत्तास्थानी जे मंत्री आणि मुख्यमंत्री बसतात त्यांची कुवत काय आहे, हे गेली काही वर्षे आम्ही पाहतो आहोत. प्रश्नांची जाणसुद्धा नसते. शरद पवार किंवा विलासराव देशमुख यांना प्रश्नांची तरी जाण होती. बाकी मुख्यमंत्र्यांना, किंवा मंत्र्यांना प्रश्न समजवायला डोकं फोडावं लागतं. एक-एक, दीड-दीड तास सांगूनसुद्धा त्यांना प्रश्न काय आहे ते कळत नाही आणि त्या प्रश्नातून मार्ग निघत नाही. अशा वेळेला मी कपिल मुख्यमंत्री होईल वगैरे म्हणतोय. त्याची ताकद काय आहे ते सांगतोय.
Nikhil Wagle's special article about teacher MLA Kapil Patil
बहुजनांशी जोडलेला माणूस. समतेच्या विचारांशी जोडलेला माणूस. या सगळ्या राजकारणाच्या गटारगंगेतून काही तरी पॉझिटिव्ह काढू शकणारा असा हा माणूस आहे. ह्याच्यासाठी महाराष्ट्रात माणसं कमी आहेत. तेव्हा हा महत्त्वाचा माणूस आहे. मला कपिलला एवढीच विनंती करायची आहे की, माझ्या मते राजकारण काय आहे ते सोडून द्या. कोणता पक्ष सत्तेवर येतो ते सोडून द्या. पुढचा काळ अधिक कठीण असणार आहे. राजकारणाच्या दृष्टीने नाही तर आपल्या तरुण मुलांच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. त्या सगळ्या प्रश्नांवर शिक्षक भारतीने लक्ष केंद्रित करावं. तुम्ही सगळे शिक्षक आहात. तुम्ही नवा समाज घडवता, असं सांगितलं जातं. आज जे गुजरातमध्ये चाललंय. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी पंतप्रधान व्हायला माझी हरकत नाही. लोकांनी निवडून दिलंय, त्यांनी व्हावं. पण आम्हांला स्वातंत्र्य आंदोलनापासून जो वारसा मिळालेला आहे तो वारसा जर तुम्ही नष्ट कराल आणि भारत नावाच्या संकल्पनेला जर तडा द्याल तर ते आम्हांला चालणार नाही.
मी कपिलला आधीच सांगितलं होतं तुमची शिक्षकांची सभा आहे तरी मी इथे बोलणार आहे. कारण हा राजकीय प्रश्न नाहीये. हा माझ्या मुलांचा, तुमच्या मुलांचा, पुढच्या पिढ्यांचा प्रश्न आहे. कशा प्रकारचं शिक्षण आपण वर्गात देणार आहोत? गांधीजींचा खून करणारा नथुराम गोडसे राष्ट्रपुरुष होता, असं सांगणारी पुस्तकं जर आपण वर्गात शिकवणार असू तर या देशाचं काही खरं नाही. आणि गुजरातमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. दिनानाथ बात्राची जी पुस्तकं पुरवणी वाचन म्हणून लावलेली आहेत. आणि ज्या पुस्तकांना देशाच्या पंतप्रधानांनी प्रस्तावना लिहिलेली आहे, ती पुस्तके म्हणजे इतिहास नसून खोटेपणाचा प्रचार आहे. आजही ज्यांना अखंड भारताचं स्वप्न बघावं वाटतं ते लोक भारत नावाची संकल्पना समजू शकत नाहीत. हे माझं म्हणणं आहे. आणि माझा भरोसा सगळ्यात जास्त शिक्षकांवर आहे, हे लक्षात घ्या. ज्या क्षणी हा देश सर्वधर्म समभाव म्हणा, धर्मनिरपेक्षता म्हणा जे काही तुम्ही म्हणता ती सोडेल. गुण्या गोविंदानं नांदणं सोडेल, त्याक्षणी या देशाचे तुकडे होतील आणि ते होऊ न देणं हे तुम्हां शिक्षकांवर अवलंबून आहे. हे मी राजकारणविषयी बोलत नाही. मला काँग्रेसकडून काही अपेक्षा नाही. मला भाजपकडून काही अपेक्षा नाही. पण आपण समाज मिळून कोणती मूल्य मुलांना शिकवणार आहोत? आपण फुले-आंबेडकर म्हणतो. फुले-आंबेडकरांच्या सगळ्या चरित्रातून जी मूल्यं शिकतो त्या समतेच्या मूल्यांचं अख्ख्या जगामध्ये काय चाललंय तुम्ही बघा. सिरीया असो, इराक असो. धर्मा-धर्माच्या नावावर इथे लढाया चालू आहेत. एका बाजूला आपण म्हणतो जग आधुनिक झालं, फेसबुकवर आलं, ट्विटरवर आलं. दुसऱ्या बाजूला लढाया कोणत्या चालल्यात? त्याच जुन्या लढाया. धर्माच्या नावाच्या लढाया. मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या लढाया. जाती-जाती आणि वर्ण यांच्यावरून लढाया सुरू आहेत. अमेरिकेमध्ये फर्ग्युसनबद्दलचं प्रकरण बघा. गोळ्या घातल्या त्या मुलाला. काय प्रकरण आहे तुम्ही बघा. माझी शिक्षक म्हणून तुम्हांला ही कळकळीची विनंती आहे की, वर्गामध्ये मुलांना हे सांगा. हे बोललं पाहिजे. जर कोणता मुख्याध्यापक सांगत असेल की वर्गामध्ये राजकारण बोलू नका. तर मला त्यांना, तुम्हांला एवढंच सांगायचं आहे की, हे राजकारण नाहीये. हे राष्ट्रकारण आहे. आपल्याला कसा समाज पाहिजे. यू. आर. अनंतमूर्ती वारले. एवढा मोठा साहित्यिक. 'संस्कार'सारखी कादंबरी त्यांनी लिहिली. ज्यांनी संपूर्ण कन्नड साहित्य देशाच्या नाही जगाच्या पातळीवर आणलं आणि भारतीय साहित्याचं एक व्यासपीठ निर्माण केलं. एवढा मोठा साहित्यिक. त्यांचं सााहित्य वाचलं पाहिजे, त्यांचे विचार वाचले पाहिजेत. त्यांचा आदर वाटला पाहिजे. असा साहित्यिक जातो. तो गेला म्हणून कर्नाटकामध्ये चिकबगनूममध्ये एका पक्षाचे लोक फटाके वाजवतात. कारण त्यांनी मोदींवर टीका केली होती निवडणूकीपूर्वी. आनंद व्यक्त करतात. कसला समाज आपण जन्माला घालतोय?
हिंदू धर्मात जे सांगितलेले आहे ते यांना कळत नाही. तो धर्मही यांना माहीत नाही. एक एवढा मोठा साहित्यिक जातो. त्यावेळेला सुद्धा आपण मनातली शत्रू भावना जर विसरू शकत नसू, तर हा काय प्रकार आहे?
शाळेपासूनच कळत-नकळत हे विष पेरलं जातंय. माझी तुम्हांला कळकळीची विनंती आहे. तुम्ही शिक्षक भारतीचे सदस्य आहात. तुम्ही फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, फातिमा शेखचा, ताराबाई शिंदेंचा सगळा वारसा सांगता. मी राजकीय कार्यकर्त्यांवर अवलंबून नाही. राजकीय मारामाऱ्या व्हायच्या त्या होऊ द्या. शिक्षक भारती सारख्या संघटनेने पुढच्या काळात असं काही तरी काम केलं पाहिजे, जीवन मूल्यांशी जोडलेलं काम. शिक्षकांना कपिलने पगार वेळेवर दिला ही उत्तम गोष्ट आहे. रोजच्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. रात्रशाळा वाचल्या, अतिशय उत्तम गोष्ट आहे. पण जीवनमूल्यांशी जोडलेलं काम आणि माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो, शाळेमध्ये एक जरी शिक्षक चांगला भेटला तर तुमचं आयुष्य बदलतं. आमचं आयुष्य पुस्तकानं नाही बदललं. आमचं आयुष्य एका शिक्षकाने बदललं. ज्यांनी आम्हांला योग्य माणसांच्या भेटी घालून दिल्या. त्यांनी पुस्तकाबाहेरचं जग काय आहे हे आम्हांला सांगितलं. म्हणून मला तुम्हांला शिक्षक म्हणून ही कळकळीची विनंती करायची आहे की, आपल्या विद्यार्थ्यांना अशा जगात घेऊन जा, जे जग पुस्तकाच्या चौकटीत बांधलं गेलेलं नाही. पुस्तकं तर वाचायला लागतातच. पण पुस्तकाबाहेरचं जग आहे ते विद्यार्थ्यांना दाखवा. शिक्षणक्रम असतो, तुमचं सिलॅबस असतं, सर्वकाही शिकवायचं असतं. शाळेच्या अडचणी असतात. पण कधीतरी दाखवा चांगला सिनेमा, चांगलं नाटक काय असतं. एखादा संगीतकार काय वाजवतो, ते कसं समजून घ्यायचं. हे मुलांना सांगा. आज महाराष्ट्राची जी वाईट अवस्था आहे ह्याचं कारण असं आहे की, लहानपणापासूनच आपण हा संस्कार करत नाही. लहानपणापासून जर आमच्या मुलांवर टी.व्ही. सिरिअलचा संस्कार होत असेल; तर महाराष्ट्र शुद्धीवर राहणार कसा? त्या टी.व्ही. सिरिअल्समधून कोणती मूल्ये दाखवली जातात, हे तुम्ही मुलांना समजून सांगायला पाहिजे. शिक्षक भारती मोठं काम करू शकते. तुम्ही फिल्म क्लब्ज् काढू शकता शाळाशाळांतून. चांगल्या इंटरनॅशनल फिल्मस् आहेत. इराणी फिल्मस् आहेत. ज्यांच्यामध्ये मुलांविषयी काही सांगितलेलं असतं, त्या मुलांना दाखवू शकता. असं कुठे नाही की, लहानपणी चांगल्या फिल्मस् बघू नयेत. ७ वी, ८ वीतल्या मुलांना चांगल्या फिल्मस् दाखवू नयेत? चांगली पुस्तके वाचू नयेत? आम्ही जी.ए. कुलकर्णींचं 'काजळ माया' सातवी-आठवीतच वाचलं होतं. आम्हांला तेव्हा समजलंही नव्हतं. पण वाचलं होतं. हा जो संस्कार आहे, तो शिक्षक म्हणून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार का? मुलांपर्यंत पोहोचवणार का? हा खरा प्रश्न आहे. माझी कपिलला विनंती आहे, कपिलच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. म्हणून मी त्याला मुख्यमंत्री करून टाकलेलं आहे. पण हे काम आता पुढच्या काळात शिक्षक भारतीने केलं पाहिजे. दोन निवडणुका तुम्ही जिंकलात. तिसरी जिंकणं काही अवघड नाही. पण हे शाश्वत काम आहे. शिक्षकांच्या माध्यमातून करण्याजोगं. शिक्षणासारखं उत्तम माध्यम नाही. तुम्ही जो संस्कार कराल तो शेवटपर्यंत टिकतो. लहानपणी चांगला शिक्षक भेटणं हे मी स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेलय आणि आता माझ्या मुलाच्या आयुष्यात पण अनुभवलयं. एक चांगला शिक्षक तुमचं सगळं जग बदलून टाकतो. तो तुम्हांला जग दाखवतो. त्यामुळे तुम्ही एकेक शिक्षक जरी अशी मुलांची आयुष्यं बदलवू शकलात तरी खूप मोठं काम होईल. शिक्षक भारतीसारख्या संघटनेने हेच सगळं काम पुढच्या काळात करायला पाहिजे.
ही शिक्षकांची संघटना आहे. तेव्हा तिथे पगार, वगैरे या गोष्टी होणारच, त्या आवश्यकच आहेत. पण त्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करता येईल, हा तुम्ही विचार करा. मी पुन्हा एकदा कपिलचं अभिनंदन करतो, त्याने हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल आणि पुढच्या काळामध्ये त्याच्या कामगिरीवर आमचं सगळ्यांचं लक्ष राहील, तुमचंही राहू दे. विधानपरिषदेत आणखी कोणती भाषणं कपिल पाटील यांची होतात, कोणते प्रश्न ते लावून धरतात, याकडे लक्ष राहील. त्याच्या पुढच्या वाटचालीला आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला माझ्या शुभेच्छा! मी आजपर्यंत तुमच्या बरोबर राहिलेलो आहे. कपिलबरोबर राहिलेलो आहे, प्रश्नांच्या बाबतीमध्ये. यापुढेही राहील आणि जर चुकलं तर टीकाही करीन.
Nikhil Wagle's special article about teacher MLA Kapil Patil
धन्यवाद!
0 टिप्पण्या