Experimental Reformer "Raja Chhatrapati Shahu Maharaj" | कर्ते सुधारक— "राजा छत्रपती शाहू महाराज"

 26 जून ही तारीख नव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहावी इतकी असाधारण महत्त्वाची आहे. कारण त्या तारखेला 1874 मध्ये राजर्षी, लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला.कोल्हापूरचे चौथे छत्रपती यांची हत्या माधव बर्वे नावाच्या त्यांच्याच ब्राह्मण दिवाणाने 24 डिसेंबर 1883 रोजी अहमदनगर येथे घडवून आणली. कागलच्या घाटगे घराण्यात 26 जून 1874 रोजी राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झाला व दिनांक 17 मार्च 1884 रोजी दत्तक विधान होऊन ते कोल्हापूरच्या राजगादीचे वारसदार झाले.फ्रेझर व इतर नामवंत, बाबासाहेब इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत 10 वर्षे शिक्षण झाल्यावर शाहू महाराजांचा दि. 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक संपन्न झाला. राज्याभिषेक संपन्न होताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून आपल्या राज्यात "शिवराज्याभिषेक शका" नुसार राज्यकारभार सुरू केला.

                                 महाराजांचे शिक्षण सुरू असतानाच त्यांना भारतातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक ,सांस्कृतिक अवस्था अवगत झाली.महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झालेले होते.परंतु सत्यशोधक चळवळ व त्यांचे शिक्षणासंबंधीचे विचार शाहू महाराजांना माहित झाले होते. ब्राह्मण सर्वच पातळीवर धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाची लूट करत आहे.यालाच महाराजांनी ब्राह्मणी ब्युरोक्राॅसी( Bramhnical Beurocracy)म्हटले आहे. तर ब्राह्मणांच्या विकृत बुद्धीला त्यांनी बौद्धिक दहशतवाद Intelectual Terrorism म्हटले. त्यासाठी संत कबिरांचा हवाला दिला "बहुजन कहेंन आँखन देखी | बम्मन कहेंन अपनी लिखी ॥" यावरून लिखाणाला केवढे महत्त्व आहे ते दिसते.

आज महाराष्ट्र ज्या तीन थोर पुरुषांची नावे कृतज्ञपणे घेऊन धन्य होतो, त्यात महात्मा फुले यांच्यानंतर डॉ आंबेडकर यांच्या थोडं आधी राजर्षींनी जीर्णशीर्ण, गलितगात्र —भान अशा समाजपुरुषावर आपल्या कर्तृत्वाचे चैतन्यशील, रसरशीत संस्कार करून नवजीवन दिलं. आज फुले —शाहू— आंबेडकर हे महाराष्ट्राचं वैचारिक अधिष्ठान झालं आहे. स्वातंत्र्य ,समता, बंधुता  या ध्येयाच्या सिद्धीसाठी या भक्कम अधिष्ठानाशिवाय पर्याय नाही. शाहूंचं वर्णन त्यांच्या चरित्रकारांनी एक "क्रांतिकारक राजा"असं केलं आहे. आजपर्यंत कोणत्याही राजाचं वर्णन "क्रांतिकारक" म्हणून केलं गेलं नव्हतं. पण राजर्षी शाहूंचं दुर्दैव आणि देशाचे सुदैव की,त्यांना राजा असूनही अन्याय स्थापित व्यवस्थेच्या विरोधात क्रांती करावी लागली.क्रांतिकारकाच्या वाट्याला जो त्रास,मनस्ताप,मृत्यूचा धोका येतो तो सर्व त्यांनी पत्करला, सहन केला. मात्र, मरेपर्यंत क्रांतिकारकाची भूमिका सोडली नाही. एवढी खडतर,पण सफल क्रांती भारतातील एकाही राजाला करता आली नव्हती, हे त्यांचं असाधारणत्व आहे.

26 जुलै 1902 रोजी सरकारी नोकर्‍यांतील 50 टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश काढून भारतात एका नव्या क्रांतीचा प्रारंभ ह्या मानवतावादी महामानवाने केला.

बहुजन समाजाची उन्नती केवळ शिक्षणानेच होणार हे महात्मा फुले यांनी वारंवार सांगितलं,म्हणूनच राजर्षींनी "गाव तेथे शाळा" ही धडक मोहीम उघडली. त्यासाठी सरकारी खजिना रिकामा केला. उच्च शिक्षण देऊन चार उच्चवर्णीयांना शिक्षण देणारं" राजाराम कॉलेज" पैशाअभावी बंद पडलं तरी चालेल,अशी न्यायनिष्ठुर समतावादी भूमिका घेऊन  "Not cake for the few until all are served with bread"असं अलंकारिक भाषेत खडसावले.

                   फुले,शाहू,आंबेडकर ही साखळी चळवळीत काम करणाऱ्यांना माहित आहेच. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सधन कुणबी कुटुंबातील होते. अस्पृश्य नव्हते, पण वर्णात शूद्र होते. राजर्षी शाहू महाराज स्वतः छत्रपतींचे वारसदार, संस्थानिक ,कोल्हापूर राज्याचे छत्रपती होते .शेतकरी कुणबी कुळातील होते. तेही अस्पृश्य नव्हते, पण वर्णात शूद्र होते.यापलीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जरी एका सेवानिवृत्त सुभेदाराचे पुत्र होते तरी समाजात ते अस्पृश्य होते. वर्णात बहिष्कृत— अवर्ण व अतिशूद्र होते. असे असतानाही राजर्षी शाहू महाराजांनी कुणबी-मराठा समाजासह सर्वच बहुजन समाज व विशेषतः या बहिष्कृत महार समाजास "सामाजिक न्याय"देण्याचा सतत प्रयत्न केला. इंग्रजांचे राज्य व त्यांचा संस्थानावर अंकुश असतानाही शाहू महाराजांनी आपले राजपद वाचविण्यासाठी "सामाजिक परिवर्तनाची"दिशा बदलली नाही. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य त्यांना पार पाडता आले आणि त्या अर्थाने ज्योतिबांना सयाजीराव महाराज गायकवाड नंतर अत्यंत ताकदीचे वैचारिक वारसदार शाहू महाराजांच्या रुपाने मिळाले. भगवान गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांचे तत्त्वज्ञान ज्याप्रमाणे सम्राट अशोकाने जगभर पोहोचविले. त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज व सयाजीराव महाराज गायकवाड यांनी ज्योतीबांचा विचार समाजमनात रुजविले. हाच शाहू महाराजांचा वारसा पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला.

                  ज्या ब्राम्हणशाहीला इंग्रज सरकार वचकून होते. ती ब्राह्मणशाही उघडून उद्ध्वस्त करण्यासाठी शाहूमहाराज कामाला लागले. यात बहुजन समाज मुक्ती हाच प्रमुख उद्देश होता. फुलेंच्या काव्याने शाहू महाराजांचे डोळे उघडले.त्यांनी संस्थानातील नोकरांचा आढावा घेतला तर शंभर पैकी 80 ब्राह्मण व 20 पारशी, प्रभू,शेणवी,युरोपियन, अँग्लो-इंडियन, ब्राह्मणेतर. पण एकही मराठा, माळी,महार,साळी,तेली,वंजारी, कुणबी नाही म्हणूनच महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी जगातील पहिला जातीवर आधारित आरक्षणाचा निर्णय घेतला. शासकीय व खाजगी खात्यातील सर्वच नोकऱ्यांत "ब्राह्मण, पारशी, शेणवी,कायस्थप्रभू" वगळता इतरांना 50 टक्के आरक्षण सक्तीचे केले व राबविले.वास्तविक कोल्हापूर संस्थानात ब्राह्मण तीन टक्के व बहुजन समाज 97 टक्के होता. बहुजन समाज शिकल्यानंतर आरक्षणाचे हे प्रमाण वाढविण्याचे ठरविले होते.

            आरक्षण जातीवर ठरवण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला. कारण हिंदू धर्मात ब्राह्मण व तत्सम जाती वगळता कुणालाही शिक्षण घेता येत नव्हते. म्हणजेच धर्माज्ञेनेच सर्व शुद्र अतिशुद्रजाती व स्त्रियांवर सक्तीची शिक्षण बंदी होती. इंग्रजांच्या उदारमतवादी धोरणाचा फायदा घेऊन थोडे बहुजन शिकले होते. पण गुणवत्ता नाही, या सबबीखाली ब्राह्मणी प्रशासन त्यांना नोकरीत घेत नव्हते. म्हणून जात हाच आरक्षणाचा एकमेव व्यवहारी आधार मानला गेला. अनेक मराठे ब्राह्मणांपेक्षा श्रीमंत होते. पण ते अशिक्षित होते.शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळले नव्हते. यासाठी शाहू महाराजांनी बहुजन समाजास शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी शाळा उघडल्या. जातवार निवासी वसतीगृहे बांधली. आणि वैदिक धर्मावरच बॉम्ब ब्लास्ट केला त्यासाठी जातीवरच प्रहार केला.

यानंतर महाराजांनी अस्पृश्यता बंदी, बालविवाह बंदी,विधवा विवाह, अंतरजातीय विवाह, सक्तीचे शिक्षण, गरिबांना शिष्यवृत्ती,कुळकर्णी पदे रद्द करून तलाठी नेमणे, महावतने रद्द करणे, स्त्रियांना अधिकार ,गुन्हेगार जमातींना न्याय देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, हुशार मुलांना परदेशात पाठविणे, बहुजनांना व्यवसाय काढून देणे असे प्रचंड कार्य केले. महाराज कृतिशील सुधारक होते. अस्पृश्यता बंदी— सांगूनच ते थांबले नाही तर त्यांनी स्वतःचा स्वयंपाकी, नोकर, ड्रायव्हर ,घरगडी ,बॉडीगार्ड यामध्ये अस्पृश्यांना सरळ सेवा भरतीने घेतले. गंगाराम कांबळेस हॉटेल काढून दिले व स्वतः दररोज तेथे एकदा तरी चहा नाश्ता करायला जात .बैठकी ,भेटी तेथेच घेत.त्यामुळे कांबळेचा धंदाही तेजीत होता. याला म्हणतात कर्ते सुधारक.

                                महाराजांनी अ.भा.मराठा शिक्षण परिषद स्थापन केली. देशभरातील बहुजनांचे नेतृत्व केले. नागपूर व कानपूर येथील मागास जाती परिषदेमध्ये विचार मांडले. जगातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभारण्यासाठी सुरुवात केली.प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते त्याचे 1920 मध्ये भूमिपूजन केले. तसेच पहिल्या जागतिक महायुद्धात "मराठा बटालियन" घेऊन त्यांना भेटण्यासाठी ही तिकडे गेले. सामाजिक न्याय स्थापित करण्यासाठी महाराजांनी बहुजन समाजातील लेखक, कलाकार, नकलाकार, नाटककार, पत्रकार, चित्रपट ,उद्योजक ,व्यापारी व राजकारणी अशा अनेक क्षेत्रांत प्रोत्साहन दिले.

 असा हा जनतेचा लाडका छत्रपती दि. 6 मे 1922 रोजी आपल्यातून निघून गेला.त्यावेळी डॉ. आंबेडकर परदेशात होते. ते महाराजांना "दलित समाजाचे महान हितचिंतक व महान कैवारी" मानत. त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणासारखा साजरा करावा, असे आवाहन बाबासाहेबांनी परत आल्यावर श्रद्धांजलीपर भाषणात केले होते.

अशा या क्रांतिवादी महान कर्त्या सुधारक छत्रपतींचा वाढदिवस नक्कीच सर्व बहुजनांनी सणासारखा साजरा करण्याइतके महत्कार्य या थोर व्यक्तित्वाच्या हातून झालेले आहे.

पूनश्च एकदा असे हे बहुजनांचे कैवारी "छत्रपती शाहू महाराज" यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व त्यांच्या कार्याला सलाम

.................................................

शिवमती 

अरूणा जाधव((शिंदे)

जिल्हाध्यक्षा

जिजाऊ ब्रिगेड नांदेड द.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या