MHT-CET Engineering, Pharmacy सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू. या तारखेपर्यंत Online Registration करता येईल.

 


बारावीनंतर अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) आणि बी. एस्सी (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा (MHT-CET) घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. इच्‍छुक विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी (Online Registration) करता येईल.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भात सविस्‍तर सूचनापत्र जारी केले आहे. कोरोना महामारीमुळे बारावीच्‍या परीक्षा रद्द केल्‍यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये पुढील प्रक्रियेबाबत अस्‍वस्‍थता वाढली होती. प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सीईटी सेलने मंगळवारी (ता. ८) रात्री उशिरा सूचनापत्र जारी करत महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली आहे. पात्रतेच्‍या अटी- शर्तींसह सविस्‍तर सूचनापत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.


विलंब शुल्‍कासह १५ जुलैपर्यंत मुदत

सीईटी सेलतर्फे सध्यातरी केवळ नोंदणी प्रक्रियेबाबतच्‍या तारखांची घोषणा केली आहे. परीक्षेच्‍या तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही. दरम्‍यान, नियमित शुल्‍कासह ऑनलाइन नोंदणीची मुदत ७ जुलैपर्यंत आहे, तर ८ ते १५ जुलैदरम्यान पाचशे रुपये विलंब शुल्‍कासह विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.


बारावीच्‍या अभ्यासक्रमावर भर

सीईटी परीक्षा संगणकावर आधारित (कॉप्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) असेल, तसेच चुकीच्‍या उत्तरासाठी गुण कपात (निगेटिव्‍ह मार्किंग) लागू नसेल. परीक्षेत राज्‍य स्‍तरावरील शिक्षण मंडळाच्‍या शिक्षणक्रमावर आधारित प्रश्‍न विचारले जातील. यात २० टक्‍के प्रश्‍न अकरावी, तर उर्वरित ८० टक्‍के प्रश्‍न बारावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित असतील. परीक्षेत तीन पेपर असतील. पहिला पेपर गणित (मॅथेमॅटिक्‍स) विषयाचा असेल. प्रत्‍येक प्रश्‍नाला दोन गुण याप्रमाणे परीक्षेत ५० प्रश्‍नांसाठी १०० गुण असतील. पेपर दोनमध्ये भौतिकशास्‍त्र (फिजिक्‍स) आणि रसायनशास्‍त्र (केमिस्‍ट्री) या विषयांचे प्रत्‍येकी ५० असे एकूण १०० प्रश्‍न विचारले जातील. प्रत्‍येक प्रश्‍नाला एक याप्रमाणे शंभर गुणांसाठी हा पेपर असेल. तर पेपर क्रमांक तीन जीवशास्‍त्र (बायोलॉजी) विषयावर आधारित असेल. यात प्रत्‍येकी एक गुणासाठी असे शंभर प्रश्‍न विचारले जातील. तिन्‍ही पेपरांसाठी प्रत्‍येकी नव्वद मिनिटे वेळ असेल.


निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच

दोन वर्षांपूर्वी निकाल जाहीर करण्याच्‍या पद्धतीवरून गोंधळ झाला होता. यानंतर नियोजनात गतवर्षी सुधारणा केल्‍या होत्‍या. त्‍यानुसार यंदाही भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपची स्‍वतंत्र परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना दोन्‍ही ग्रुपसाठी प्रविष्ट होता येईल. मात्र, परीक्षा केंद्र वेगवेगळे असण्याची शक्‍यता आहे. दरम्‍यान, या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या