वृक्षतोड, जंगल तोड, लाकूड चोरी, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. अवेळीचा पाऊस, वाढती उष्णता, पाऊसमान कमी झाल्यामुळे जाणवणारी पाण्याची कमतरता, निसर्गावर विजय मिळवण्याचा माणसाचा अट्टाहास.. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे.
हां. यामध्ये काही जमेच्या बाजू सुद्धा आहेत. शासनाने काही कडक निर्बंध घातले आहेत. लोकसुद्धा जागरूक होत आहेत. अनेक पर्यावरण प्रिय लोक संघटना स्थापून पर्यावरण संरक्षणासाठी काम करत आहेत. या मधलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे वृक्षारोपण. दरवर्षी 5 जून ला जागतिक पर्यावरण दिन आणि जून महिन्यामध्ये होणारी पावसाळ्याची सुरुवात त्यामुळे जून महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. पण त्यामध्ये बरीचशी रोपे ही विदेशी जातीचे असतात. त्यांचे वयोमान कमी असते. त्यापासून मिळणारे ऑक्सीजनचे प्रमाणही कमी असते. यावर पक्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात राहत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या भारतीय हवामानात टिकून राहण्याची त्यांची क्षमता कमी असते. याउलट भारतीय जातीची झाडे सगळ्याच बाबतीत वरचढ असतात. त्यांचे वयोमान खूप जास्त असते. ऑक्सीजन देण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते. विस्तार मोठा असल्यामुळे मिळणारी सावली जास्त असते. त्यांचे वयोमान संपल्यानंतर मिळणारे लाकूड सामान सुद्धा उच्च प्रतीचे असते. तरीही आपण ही भारतीय जातीची झाडे सोडून जलद वाढणारी जलद मोठी दिसणारी म्हणून विदेशी झाडे लावतो. त्याचाच परिणाम म्हणून रस्त्याकडेला असणारी वडाची, पिंपळाची चिंचेची, कडुलिंबाची झाडे आता दिसेनाशी झाली आहेत. कालांतराने पुढच्या पिढीला ती बघायलासुद्धा मिळतील का नाही अशी अवस्था आहे. परवा माझ्या बाबांच्या बागेत खुरपणी चे काम करत होतो. तेव्हा आमच्या घरातली दोन चिमुरडी आली आणि म्हणाली आम्हाला पण झाडे लावायचे आहेत. मी त्यांना म्हणालो झाडे लावणे सोपं आहे, पण जगवणं खूप अवघड आहे. मी तुम्हाला झाड देण्यापेक्षा तुम्ही दोघांनीच झाडे तयार करा, बघूया जमतंय का? झाड उगवायला आणि जगायला खूप नशीब पाहिजे. त्यासाठी खूप कष्ट करायला पाहिजे. जर तुमच्या हातून झाडं जगलं तर तुम्ही खरे भाग्यवंत. जा तुम्हाला कोणती आवडेल ती बी घेऊन या. त्यापासून आपण रोपटे तयार करू आणि ते लावू. माझी मुलगी आत गेली आणि कच्चा कैरीची कोय घेऊन आली. मी म्हंटलं अगं ती कच्ची आहे, कशी उगवणार? मग तिने आत जाऊन आदल्यादिवशी आणलेल्या फणसाच्या बिया आणल्या. मी म्हटलं त्या सुद्धा उगवून येणं कठीणच आहे. त्यापेक्षा तू अजून दुसरी कोणती तरी बी घेऊन ये, जरा छोटी बी आणं. ती परत आली आणि आपल्या छोट्याशा मुठीतून चार-पाच चिंचुके घेऊन आली. मी हसत हसत तिला विचारलं तुला हे कुठून मिळालं? "काल रस्त्याकडे फिरत केल्यावर मला चिंच सापडली होती ती मी खाल्ली या त्याच्या बिया." मी तिला सांगितलं चिंचेच्या बियाला चिंचुके म्हणतात. पण हे चिंचुके उगवून जर त्याचे रोप तयार झाले तर तुझ्या सारखी भाग्यवान कोण नाही. असे म्हटल्यावर तिने चहाच्या जुन्या कागदी कपात माती भरली. पाणी घातलं आणि मला विचारलं कि बी एकदम खाली पुरायची? का एकदम वर ठेवायची? मी सांगितले एकदम खाली नाही पुरायची आणि वर पण नाही ठेवायचे. त्याच्यावर थोडीशी माती राहील एवढीच पुरायची. आणि तिला रोज थोडं पाणी घालायचं. ती रोज सकाळी उठल्यावर त्या कागदी कपात पाणी घालू लागली. आठ-दहा दिवस झाले तरी चिंचुका काही उगवून येईना. रोज उठली की त्या कपा जवळ जायची आणि चिंचोका उगवला नाही म्हणून नाराज होऊन माझ्याजवळ यायची. अजून उगवला नाही, माझं नशीबच बहुतेक चांगला नाही. हे तिचे बोलणं. मी तिला सांगायचं वेळ लागते ते उगवायला. लगेच नाही उगवत. 8 चे 15, 15 चे 20 दिवस झाले तरी चिंचोका काही उगवला नाही. आता मला पण वाटू लागलं चिंचोका पक्व नसल्यामुळे कदाचित उडणारच नाही. मग ती नाराज होऊ नये म्हणून मी तिची समजूत काढू लागलो. बाळा चिंचेचे झाड सहजासहजी उगवत नाही. शंभर लावले तर एखादं उगवतं. नाही उगवलं तर नाराज होऊ नकोस. आपण दुसरी कोणती तरी अजून झाडं लावू. पण तिने चिकाटी सोडली नाही. पाणी घालतच राहिली. शेवटी 25 -26 व्या दिवशी मातीतून साल सोलून हिरवा झालेला चिंचोका वर आला. ते बघून तिला इतका आनंद झाला की ती तो कागदी कप घेऊन घरभर नाचू लागली. तिच्या आनंदाबरोबरच माझा आनंद गगनात मावेना. त्या बिजांकुराला चार-पाच दिवसात छोटी छोटी पाणी येऊ लागली त्याचं रोपटं तयार झालं. या रोपा बरोबरच फणसाची दोन आणि भाच्याने लावलेले चिंचेचे एक रोप तयार होऊ लागले आहेत. ती चारही रोपे आम्ही माझ्या बाबांच्या वाढदिवसादिवशी एक जुलै ला आमच्या शेतात लावणार आहोत.😊🌱🌳
0 टिप्पण्या