पंडीत नेहरू यांच्या कमकुवत धोरणामुळे कशमिर प्रश्न - राज्यपाल भगत सिंह कोशयारी

 पंडित नेहरू यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या विधानावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

पंडित नेहरू यांच्या धोरणामुळं देश सुरक्षेच्या बाबतीत कमकुवत राहिला असं वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काँग्रेसच्या टीकेच्या रडारवर आले आहेत.


   देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. त्यांनी दिलेले संदर्भ अर्धसत्य, अपूर्ण आणि वास्तविकतेचा विपर्यास करणारे आहेत. शांततेचे पुरस्कर्ते असणे याचा अर्थ कमकुवत असणे, असा होत नाही. तसे असेल तर मग संवाद आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी लाहोरला 'सदा ए सरहद' बस घेऊन जाणारे अटलबिहारी वाजपेयी, पाकिस्तानात मोहम्मद अली जिना यांच्या कबरीला भेट देऊन वैचारिक कोलांटउडी घेणारे लालकृष्ण अडवाणी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अनाहूतपणे लाहोरला जाऊन सद्भावनेचा संदेश देणाऱ्या नरेंद्र मोदींनाही कोश्यारी कमकुवत समजतात का? हा प्रश्न उपस्थित होतो. शांततेची अभिलाषा बाळगणाऱ्या नेहरूंवर कमकुवतपणाचा ठपका ठेवला जात असेल तर वाजपेयी, अडवाणी आणि मोदींना सुद्धा तोच न्याय लावावा लागेल. 


वाजपेयी यांच्या पूर्वीची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर नव्हती, हा आरोप अत्यंत चुकीचा व देशाच्या अनेक माजी पंतप्रधानांचा अवमान करणारा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू यांच्याच नेतृत्वाखाली अनेक संस्थाने विलीन झाली. आधुनिक, विज्ञाननिष्ठ भारताच्या स्वप्नाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पायाभूत सुविधांची उभारणी व देशाचे परराष्ट्र धोरण ठरविण्यात पंडित नेहरू यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. 


अमेरिका आणि रशिया सारख्या दोन महासत्तांमध्ये शीतयुद्ध सुरू असताना नासेर आणि टिटो यांना सोबत घेऊन उभी केलेली अलिप्ततावादी चळवळ हे एक प्रकारे नेहरूंनी जागतिक महासत्तांना दिलेले आव्हान होते. लालबहादूर ‌शास्त्री यांच्या काळात भारताने लाहोरपर्यंत धडक दिली. इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, सियाचिन ग्लेशियर ताब्यात घेण्यात आले. राजीव गांधी यांच्या काळात पंजाब व पूर्वोत्तर राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय झाले. चीन व पाकिस्तानच्या सिमेवर यशस्वी लष्करी मोहिम राबवल्या. दोषारोप करण्याचा हेतू नाही. मात्र ज्या कारगिल विजय दिनी राज्यपाल बोलत होते, ते कारगिल युद्ध आणि तत्पूर्वीची पाकिस्तानची घुसखोरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात घडली, हा इतिहास विसरून चालणार नाही.


भारताच्या आण्विक सज्जतेची सुरुवात देखील पंडित नेहरू व होमी जहांगीर भाभा यांनी केली. होती. जागतिक दबावाला भीक न घालता पोखरणचा पहिला अणुस्फोट इंदिरा गांधी यांच्या काळात झाला होता. वाजपेयी यांच्या काळात झालेल्या आण्विक चाचण्यांची संपूर्ण तयारी तत्पूर्वीच्या पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाली होती. स्वतः डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्याविषयी जाहीर वक्तव्य केलेले आहे. या संपूर्ण वस्तुस्थितीकडे राज्यपालांचे कदाचित दुर्लक्ष झालेले दिसते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या